महाराष्ट्रात भाजपासोबत काडीमोड घेऊन शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं. मात्र, सुरुवातीपासूनच राज्यात भाजपाकडून सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. तसेच, आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असं देखील भाजपाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, अशी ‘भविष्यवाणी’ रावसाहेब दानवे यांनी वर्तवली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

एकमेकांच्या पायात पाय…

यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाहीये”, असं दानवे म्हणाले.

सिनेमा कितीही खराब असला…

दरम्यान, अमर, अकबर, अँथनी या विशेषणावरून त्यांनी सरकारला सिनेमाचीच उपमा दिली आहे. “सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू”, असं दानवे म्हणाले आहेत.

“कदाचित वाढत्या वयामुळे…” १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोला!

बुलेट ट्रेनसाठी उद्धव ठाकरेंना भेटणार

एकीकडे महाराष्ट्र सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका करताना दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनसाठी उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. “मला उद्धवजींनी ८ दिवसांपूर्वी फोन केला. ते माझ्याशीही बोलले. माझं दोनदा बोलणं झालं आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचं भेटायचं ठरलं आहे”, असं ते म्हणाले.