27 September 2020

News Flash

विधानपरिषद निवडणूक : मुंडे-खडसेंचा पत्ता कापला, भाजपत पुन्हा आयारामांना संधी

केंद्रीय नेतृत्वाकडून चार नावांची घोषणा

२१ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा निष्ठावंतांना संधी नाकारत पक्षात नवीन आलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे ४ उमेदवार असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून या चार उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं असून तशी यादीही जाहीर करण्यात आलेली आहे.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्याने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल. भाजपने तर तसे संकेत आधीच दिले आहेत. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मते आहेत.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मते कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्याने ही मते मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असे भाजपचे नेते ठामपणे दावा करतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्याकरिता १७४ मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर १६९ मते मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीने जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणे शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. मुख्यमंत्री किंवा एखादा वरिष्ठ नेता राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतो तेव्हा धोका पत्करला जात नाही. तेव्हा शक्यतो निवडणूक बिनविरोधच होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, अशीच चिन्हे आहेत.

‘सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी असल्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपला चार जागा मिळणार असल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपच्या गोटातून याआधीच सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 1:49 pm

Web Title: bjp released list of 4 candidates for maharashtra legislative council election no chance for pankaja munde and eknath khadse psd 91
Next Stories
1 विद्यार्थ्यांना दिलासा : अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द
2 “स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका”, औरंगाबाद दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन
3 उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवतील; संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
Just Now!
X