फडणवीसांकडून दोन्ही देशमुखांना कानपिचक्या?

आगामी सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावून तयारी हाती घेतली आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. परंतु या बैठकीत पक्षांतर्गत सुभाष देशमुख व विजय देशमुख या दोन्ही मंत्र्यांतील वाद चव्हाटय़ावर आले असता पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही कानपिचक्या दिल्याचे समजते.

बाळीवेशीतील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत तब्बल तीन तास चाललेल्या या गुप्त बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण तसेच शेजारच्या उस्मानाबाद शहर व जिल्हा शाखेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पक्षाची स्थानिक स्थिती समजून घेतली. केवळ प्रमुख पदाधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही बैठकीत प्रवेश नव्हता. या बैठकीपासून प्रसारमाध्यमांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते.

सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दोन मंत्री लाभले आहेत. परंतु त्यांच्यात कमालीचे मतभेद आहेत. त्यातून गटबाजी वाढली आहे. दोन्ही मंत्री क्वचितच एका व्यासपीठावर एकत्र येतात.

गेल्या आठवडय़ात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सोलापूर दौऱ्यात त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला होता. महापालिकेतही दोन्ही देशमुखांच्या गटात पक्ष विभागला आहे. या गटबाजीची किनार आजच्या पक्ष बैठकीत होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करायची की स्वबळावर निवडणुका लढवायच्या, यावरही खल झाल्याचे समजते.

बैठकीत चर्चा कधी हळू आवाजात तर कधी तापलेल्या मोठय़ा आवाजात होती. गटबाजी न करता एकदिलाने काम करण्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी दोन्ही देशमुखांना कानपिचक्या दिल्याची माहिती बैठकीस उपस्थित राहिलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची नावे गुपित ठेवण्याच्या अटीवर दिली.