News Flash

जळगावमध्येही भाजप-शिवसेनेत काडीमोड

लोकसभेच्या दोन्ही जागांवर सेना उमेदवारांचा प्रचार

|| युवराज परदेशी

लोकसभेच्या दोन्ही जागांवर सेना उमेदवारांचा प्रचार

राज्य पातळीवर भाजप-शिवसेना युतीचे संबंध तुटेपर्यंत ताणले जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर, जळगाव  भाजप-सेनेने एकमेकांपासून काडीमोड घेतला आहे. गेल्या ३० वर्षांपासून युतीमध्ये भाजप लढवत असलेल्या जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी करत उमेदवारही जाहीर केले आहेत. शिवसेनेचे उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघातून चोपडय़ाचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या दोन्ही संभाव्य उमेदवारांनी प्रचारदेखील सुरू केला आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दोन मातब्बर नेत्यांमुळे जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. युतीमुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपचे प्राबल्य राहिले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात विधानसभा क्षेत्रनिहाय पक्षीय बलाबल पाहता येथे शिवसेनेचा वरचष्मा दिसून येतो. पाचोरा, भडगाव, पारोळा, धरणगाव, जळगाव तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील तर धरणगावमधून शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहे. जळगाव शहरात शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन यांची मोठी ताकद आहे. असे असतांनाही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार ए. टी. पाटील मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदार संघात प्रथमच शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली असून आर. ओ. पाटील यांच्या उमेदवारांची घोषणा करून प्रचारासही सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपपुढे शिवसेनेचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे. या मतदार संघात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीही उमेदवारीवर दावा केल्याने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सलग दोन वेळा निवडून आलेले पाटील यांनाच तिसऱ्यांदाही उमेदवारी मिळेल, असे खडसे अनेक सभांमध्ये जाहीररित्या सांगत असतांना महाजन गटाचे म्हणून ओळखले जाणारे वाघ वारंवार पत्रकार परिषदा घेऊन उमेदवारीवर दावा करीत आहेत. यामुळे भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासाठी गिरीश महाजन देखील प्रयत्नशील असल्याने उमेदवारीचा वाद सुरुवातीपासूनच शिगेला पोहचला आहे. या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी बाबत अद्याप अनिश्चितता आहे. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. मागील चार वर्षांत त्यांनी केलेली कामे आणि दांडगा जनसंपर्क पाहता त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रावेर मतदार संघात शिवसेनेतर्फे चोपडय़ाचे माजी आमदार कैलास पाटील यांची उमेदवारी पक्षातर्फे अधिकृत मानली जात आहे. त्यांनी मतदार संघात सभा घेऊन धनुष्यबाणाचा प्रचारही सुरू केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघाचे प्रतिनिधित्व कैलास पाटील हे करतील असा विश्वास असल्याचे जाहीर विधान चिमणराव पाटील यांनी केले. त्यांचे कार्य, नेतृत्व, परिणामकारक कामे आणि कार्यकर्त्यांची ताकद याकडे चिमणराव यांनी लक्ष वेधले. जलसंधारण, सिंचनावर देशात सर्वाधिक खर्च महाराष्ट्र शासनाने केला ; परंतु सिंचन क्षमता केवळ एक टक्क्य़ांनी वाढली, असेही पाटील म्हणाले. यामुळे रावेर मतदार संघातून शिवसेनेने निवडणुकीचे बिगुल फुंकल्याचे मानले जात आहे. जळगावप्रमाणे रावेर मतदारसंघातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे अद्याप तरी कोणता मतदार संघ कोणाकडे राहणार हे निश्चित नाही. त्यामुळे उमेदवारीबाबतही अनिश्चितता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:55 am

Web Title: bjp shiv sena alliance
Next Stories
1 जनुकीय बदल तंत्रज्ञानावरून कृषी क्षेत्रात गोंधळ
2 आरक्षण न मिळल्यास मतदान फक्त ‘नोटा’ला!
3 सोलापूर बाजार समिती घोटाळा
Just Now!
X