30 March 2020

News Flash

युती सरकार अनुभवशून्य – नारायण राणे

शिवसेना-भाजपचे सरकार हे अनुभवशून्य असून, स्वत:चा स्वार्थ साधणारी मंडळी मंत्रिमंडळात आहेत. फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याजवळ आहेत.

| July 10, 2015 12:45 pm

शिवसेना-भाजपचे सरकार हे अनुभवशून्य असून, स्वत:चा स्वार्थ साधणारी मंडळी मंत्रिमंडळात आहेत. फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याजवळ आहेत. योग्यवेळी भ्रष्टाचार बाहेर काढू, असा इशारा माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दिला. उद्योग आणण्यासाठी अमेरिकेत कशाला जायचे, असा मुख्यमंत्र्यांवर टोला लगावून त्यांनी अमेरिकेत बोटीवर झोपून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा घालविली असल्याची टीका केली.
सिंधुदुर्ग नगरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी मोर्चा निघाला. या मोर्चात बैलगाडीत बसून राणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, विकास सावंत, संजू परब, संदीप कुडतरकर, अस्मिता बांदेकर व पदाधिकारी उपस्थित होते.
या मोर्चात दिल्लीत योगा डे, महाराष्ट्रात तावडे-मुंडे, हे सरकार कोणाचे अंबानी आणि अदानींचे अशा जोरदार घोषणा देत अच्छे दिन आणणाऱ्या सरकारने प्रचंड महागाई लोकांवर लादली आहे असे मोर्चातून स्पष्ट केले गेले. पालकमंत्री यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपविरोधात जोरदार टीका केली. भाजप नौटंकी पक्ष आहे. सरकारमधील मंत्री कुचकामी आहेत. शिवसेनेने मुंबईत सिंगापूर शांघाय करण्याची घोषणा केली, पण मुंबईची दुर्दशा केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राणे यांनी केली.
भ्रष्टाचाराला मुक्ती देणाऱ्यांनी भ्रष्टाचार वाढविला आहे. लोकांना अच्छे दिनाची आश्वासने देऊन बुरे दिन आणले. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्गचा राज्यमंत्री कुचकामी आहे. त्याला धड बोलताही येत नाही. जनतेचे प्रश्न सोडविले नाही तर या पालकमंत्र्याला जिल्ह्य़ात फिरू देणार नाही असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
शिवसेना-भाजपत सध्या तुझे माझे जमेनाचा अंक सुरू आहे. त्यांनी राजकीय घटस्फोट घ्यावा. महाराष्ट्रातील जनता महागाईला कंटाळली आहे. भाजपवाले वैयक्तिक स्वार्थासाठी विकासाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. राज्यातील जनता हवालदिल बनली असताना मुख्यमंत्री मात्र अमेरिकेची वारी करत आहेत. परदेशी विमान दीड तास उशिरा निघाले असूनही मुख्यमंत्री धडधडीत खोटे बोलत असल्याची टीका राणे यांनी केली.
कोकणातील असूनही विनोद तावडे पदवीबाबत खोटी माहिती देत आहेत. विनोद तावडे व स्मृती इराणी यांचा पदवीची खोटी माहिती देतात तर सुषमा स्वराज व वसुंधराराजे यांनी ललित मोदींची भेट तर इकडे पंकजा मुंडे यांचा भ्रष्टाचार हे सारे प्रकार भाजपचेच आहेत असा आक्षेपही राणे यांनी केला.
कोकणच्या विकासावर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही. गेले आठ महिने गप्प बसलो आता यापुढे सरकारविरोधात आंदोलन भूमिका घेऊन राज्यभर फिरणार असल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला. शेतीचा हंगाम असूनही सरकारविरोधी मोर्चात लोकांनी दाखविलेली उपस्थिती हीच या सरकार विरोधातील धोक्याची घंटा आहे असे नारायण राणे म्हणाले.
यावेळी सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर, अस्मिता बांदेकर यांनी विचार मांडले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन देण्यासाठी नारायण राणे यांची काँग्रेसमधील टीम पोहचली, पण पोलिसांनी काही जणांना केबिनमध्ये जाऊ दिले. माजी मंत्री कै. भाई सावंत यांचे सुपुत्र विकास सावंत, जि. प. सदस्य एकनाथ नाडकर्णी, मनीष दळवी यांना रोखले. शेवटी विकास सावंत यांनी यंत्रणेचा धिक्कार व निषेध केला. या मोर्चात बैलगाडीतून नारायण राणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 12:45 pm

Web Title: bjp shiv sena alliance government has zero experience says narayan rane
टॅग Narayan Rane
Next Stories
1 आखाडय़ांमधील तंटय़ावर अखेर समेट
2 नाशिकमध्ये गुंडांचे राज्य
3 नाशिकमध्ये बँकेची तिजोरी फोडून १९ लाख ३८ हजारांची रोकड लंपास
Just Now!
X