|| लक्ष्मण राऊत

तीन मंत्रिपदे, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पीछेहाट या पाश्र्वभूमीवर जालना जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणूक पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्येच होईल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. युतीमधील वजनदार मंत्र्यांचा जिल्हा बनलेल्या जालना जिल्ह्य़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रभावाखाली जिल्ह्य़ाचे राजकारण आता त्यांना हवे तसे फिरू लागले आहे. अशा स्थितीत त्यांच्याशी लढत देणाऱ्या नेत्यांना अधिक सजगपणे काम करावे लागेल. सध्या युतीचे महत्त्व वाढलेले आहे.

चार वेळेस विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे राज्यमंत्री खोतकर यांचा सामना या वेळेसही काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांच्याशी होईल, हे स्पष्ट आहे. गोरंटय़ाल यापूर्वी दोन वेळेस आमदार राहिलेले असून त्यांच्या पत्नी संगीता गोरंटय़ाल जालना नगर परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. गोरंटय़ाल यांच्या विरोधात काँग्रेसमधून काहींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असली, तरी त्यांना ती मिळण्याची शक्यता नाही. मागील विधानसभा निवडणूक जालना मतदारसंघात चुरशीची आणि चौरंगी झाली होती. मागील वेळेस मुस्लीम मतदार फार मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसपासून दूर गेला होता. या वेळेसही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि उमेदवार कोण असेल हाच सध्या महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि खोतकर यांचे सूत अलीकडे जुळलेले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही युती कायम राहिली तर काँग्रेससाठी ते आव्हान ठरण्याची शक्यता आहे. खोतकर आणि गोरंटय़ाल यांच्यात आलटून पालटून विजय मिळविण्याची परंपरा यंदाही कायम राहणार का, याची उत्सुकता असेल.

परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांच्यात लढतीची शक्यता आहे. माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे पुत्र राजेश यांनीही या मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे. गेल्या निवडणुकीत परतूरमधून जेथलिया ४ हजार ३०० मतांनी पराभूत झाले होते. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा तपशील वेळोवेळी लोणीकर मतदारांना देत आहेत, तर स्थानिक नगर परिषद अधिपत्याखाली असलेल्या जेथलियांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवलेला आहे.

सलग चार वेळेस विधानसभेवर निवडून आलेले माजी मंत्री राजेश टोपे सध्या घनसावंगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दोन साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, शाळा-महाविद्यालये आणि समर्थ सहकारी बँकेचे जाळे त्यांच्या पाठीशी आहे. निवडणूक असो किंवा नसो सतत मतदारांच्या संपर्कात राहणाऱ्या टोपेंच्या विरोधात या वेळेस शिवसेनेकडून हिकमत उढाण उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांनी त्या दृष्टीने मतदारसंघात संपर्क ठेवलेला आहे. टोपे यांच्यामुळे जिल्ह्य़ात घनसावंगी मतदारसंघ राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीसाठी सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. अलीकडे टोपे यांच्याबद्दल शिवसेना किंवा भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या तरी त्यांनी अफवा म्हणून त्यांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केलेला आहे. लोकसभा निवडणुकीत टोपे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी पिछाडीवर राहिल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार संतोष दानवे आणि राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांच्यात भोकरदन विधानसभा मतदारसंघात लढत होईल. गेल्या वेळेस सलग तीन वेळेस निवडून आलेले चंद्रकांत दानवे पराभूत झाले होते. संतोष दानवे हे केंद्रीय राज्यमंत्री आणि जिल्ह्य़ाच्या राजकारणातील प्रभावशाली नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत. शिवसेनेशी झालेली युती आणि अलीकडेच जाफराबाद तालुक्यातील काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये केलेला प्रवेश राष्ट्रवादीसाठी किती अडचणीचा ठरेल हा सध्याचा प्रश्न आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून युतीमध्ये शिवसेनेकडे होता. परंतु मागील वेळेस युती नसल्याने भाजपचे नारायणराव कुचे तेथून निवडून आलेले आहेत. मागील वेळेस जवळपास ५० हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी यावेळेसही तेथून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

जालना, परतूरसह अन्य मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि उमेदवार महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या राष्ट्रवादीचा एकमेव विधानसभा सदस्य (राजेश टोपे) असलेल्या या जिल्ह्य़ात एकीकडे शिवसेना-भाजप युती प्रचंड आशावादी आहे, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे  जिल्ह्य़ात वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आव्हान असून त्यांचे लक्ष वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे आहे.

कधी नव्हते एवढे अनुकूल वातावरण सध्या जिल्ह्य़ात शिवसेना-भाजप युतीसाठी आहे. विरोधक आताच हतबल झालेले आहेत. केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्य़ात केलेली विकासाची कामे जनतेसमोर आहेत. तीन मंत्र्यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि शिवसेना- भाजपवरील विश्वास यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा पूर्ण पाडाव होईल.    – भास्कर अंबेकर, शिवसेना जालना जिल्हाप्रमुख

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढणार असून आघाडीची ताकद यावेळेस दिसून येईल. पाचही विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीसाठी कठीण आहेत. पीक विमा, पीककर्ज, वीजपुरवठा आणि अन्य प्रश्नांमुळे शेतकरी व जनतेत असंतोष आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल.   – भीमराव डोंगरे, सदस्य, अ. भा. काँग्रेस समिती

जालना विधानसभा चित्र

  • जालना – शिवसेना
  • घनसावंगी – राष्ट्रवादी
  • परतूर – भाजप
  • भोकरदन – भाजप
  • बदनापूर – भाजप