निवडणूक वेगवेगळी लढल्याने अनेक तडजोडी करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेत चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी भाजप आणि शिवसेनेही दावा केला आहे. यावर अंतिम निर्णय ेसोमवारी सकाळी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर घेतला जाणार आहे. भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केल्यानंतर विधानसभेच्या सभापतीपदी हरिभाऊ बागडे यांची निवड केली. भाजपने विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी मुंबईचे आमदार राज पुरोहित यांचे नाव निश्चित केले आहे. पुरोहित हे मुंबई प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. दुसरीकडे, नुकतेच सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेनेही विधानसभा उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. शिवसेनेकडून विजय औटी यांचे नाव देण्यात आले आहे. शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी होताना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यासारखी प्रमुख मंत्रालय हवी होती, परंतु पंधरा वर्षांपासून सत्तेबाहेर राहिल्यानंतर सत्तेपासून अधिक राहिल्यास पक्षावर विपरित परिणाम होईल, या भावनेने शिवसेनेने तडजोडी स्वीकारल्या. मात्र, आता किमान उपाध्यक्षपद तरी मिळावे आणि आणखी एका आमदाराची सोय व्हावी, या हेतूने शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, उपाध्यक्षपद नेमके कुणाला जाईल, यावर अंतिम निर्णय उद्या, सकाळी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर घेतला जाणार आहे.
कामकाज पत्रिका तयार नाही
काल पर्यंत मंत्र्याची खाती वाटप झाली नव्हती. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांना हे खाते देण्यात आल्याने सोमवारी विधिमंडळ  अधिवेशनाला सुरुवात होत असलेतरी रविवापर्यंत कामकाजपत्रिका तयार होऊ शकलेली नव्हती.