19 September 2020

News Flash

सोलापुरात एलबीटीसंदर्भात बैठक भाजप-सेना नगरसेवकांनी उधळली

एलबीटीबाबत व्यापारी व उद्योजकांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर अलका राठोड यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांना आमंत्रित न केल्याच्या निषेधार्थ भाजप-सेना

| June 19, 2014 03:46 am

एलबीटीबाबत व्यापारी व उद्योजकांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर अलका राठोड यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांना आमंत्रित न केल्याच्या निषेधार्थ भाजप-सेना युतीच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत बैठकच उधळून लावली. त्यामुळे एलबीटीबाबतचा निर्णय सोलापूर महापालिकेत होऊ शकला नाही. दरम्यान, येत्या दोन दिवसात पुन्हा बैठक बोलावून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर अलका राठोड यांनी बुधवारी सकाळी ११.३० वाजता एलबीटीबाबत धोरण ठरविण्यासाठी बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजिलेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधी, व्यापारी व उद्योजकांची एकत्र चर्चा करून अंतिम निर्णयाबाबत शासनाकडे अहवाल पाठविण्याचे ठरले होते. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते, माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र सोलापूरचे भाजपचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांना डावलले गेले. त्यामुळे त्याची जाणीव होताच ही चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. परंतु बैठक सुरू होताच भाजप-सेना युतीच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळा घातला. खुच्र्या-टेबल पालथे केले. कागदपत्रे विस्कटली. या प्रश्नावर महापौर अलका राठोड यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असा युतीच्या नगरसेवकांचा आग्रह होता. त्यानुसार दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी दर्शविली तरी गोंधळ वाढतच गेला. भाजपच्या खासदाराचा अवमान कोणी केला, असा जाब विचारत भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यामुळे अखेर महापौरांनी सभा तहकूब करून निघून जाणे पसंत केले. व्यापारी व उद्योजकांनीही काढता पाय घेतला. बैठकच रद्द केल्यामुळे एलबीटीचे त्रांगडे सुटण्याऐवजी त्यास वेगळे फाटे फुटले.
दरम्यान, ही बैठक गुंडाळली गेल्यानंतर पालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या दालनात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी भाजप-सेना युतीच्या नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. काल मंगळवारी रात्री खासदार बनसोडे यांना निमंत्रण धाडण्यात आले होते, असा दावाही त्यांनी केला. व्यापारी-उद्योजकांशी निगडित या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर युतीच्या नगरसेवकांनी गोंधळ न घालता मनाचा मोठेपणा दाखविला असता तर काही बिघडले नसते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
जकातीचा पर्याय योग्य
एलबीटीला ‘व्हॅट’ नव्हे तर जकातीचाच पर्याय योग्य असल्याचे मत पालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी व्यक्त केले. जकात प्रणाली पूर्ववत सुरू होण्यासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविला होता. शासनाने जकात रद्द केल्यानंतर सोलापूर महापालिकेला शासनाने देऊ केलेल्या ६० कोटींच्या अनुदानापैकी अद्यापि ३० कोटींचे अनुदान मिळाले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया, संजय हेमगड्डी आदींनीही विरोधकांच्या वर्तणुकीवर टीकास्त्र सोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:46 am

Web Title: bjp shiv sena corporator created problem in lbt meeting in solapur
टॅग Solapur
Next Stories
1 मनपाला भीक न घालता एएमटी बंद!
2 सांगली पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला
3 सांगली महापालिकेचे चार कर्मचारी निलंबित
Just Now!
X