जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले असले, तरी प्रथमच भाजपा, शिवसेनेने गावपातळीवरील सत्तेत पदार्पण करीत आपले स्थान बळकट केले आहे. जतमध्ये भाजपाला धक्का देत काँग्रेसने मुसंडी मारली असून खानापूर तालुक्यात शिवसेनेने वर्चस्व पटकावले. मिरज तालुक्यात स्थानिक आघाडय़ांनी सत्तांतर करीत सत्ता काबीज केली आहे. कडेगावमध्ये काँग्रेसने, आटपाडीत राष्ट्रवादीने वर्चस्व पटकावले.
आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीच्या राजेंद्र देशमुख यांच्या गटाने ८ पकी ७ ग्रामपंचायती जिंकल्या असून भाजपाचे गोपीचंद पडळकर गटाने २ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. लेंगरेवाडी, तळेवाडी येथे भाजपाने यश मिळविले आहे. कवठेमहांकाळमध्ये भाजपाचे अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीला ४ गावांत वर्चस्व मिळाले आहे तर राष्ट्रवादीला ६ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
जतमध्ये १६ ग्रामपंचायती काँग्रेसने पटकावल्या आहेत तर, भाजपाला ७, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पार्टीला प्रत्येकी १ ग्रामपंचायत मिळाली आहे. कडेगाव तालुक्यात काँग्रेसला ६, भाजपाला ३ ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली. कडेगाव येथील ग्रामपंचायतीसाठी मोठी चुरस असल्याचे दिसून आले. या ठिकाणी काँग्रेसला ८ तर भाजपाला ७ जागा मिळाल्या. खानापूरमध्ये शिवसेनेने ९ ग्रामपंचायतीत सत्ता हस्तगत केली. या तालुक्यात काँग्रेसला केवळ २ आणि भाजपाला १ ग्रामपंचायतीची सत्ता मिळवता आली. एका ग्रामपंचायतीत संमिश्र यश सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाले.
मिरज तालुक्यात स्थानिक पातळीवरील पक्षविरहित आघाडय़ांना यश मिळाले. म्हैसाळ येथे मोहनराव िशदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज िशदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून निर्वविाद वर्चस्व मिळविले. जिल्हा परिषद सदस्या अलकादेवी िशदे आणि भाजपाचे नेते दिपक िशदे यांच्या युतीला मतदारांनी पूर्णपणे नाकारले.
मालगाव या तालुक्यातील सर्वात मोठय़ा गावात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब हुळ्ळे, माजी पंचायत समितीचे सदस्य काकासाहेब धामणे आणि सदानंद कबाडगे यांनी एकत्र येउन सुरेश खोलकुंबे यांची सत्ता उलथवून निर्वविाद वर्चस्व पटकावले. आरग येथे भाजपाचे आ. सुरेश खाडे यांच्या पॅनेलने ९ जागा जिंकून वर्चस्व मिळविले असले तर सरपंचपद आरक्षणामुळे स्थानिक पातळीवरील जि.प. सदस्य प्रकाश देसाई, अरुण गतारे व आबा पाटील यांच्या गटाला मिळणार आहे. या गटाला ८ जागा मिळाल्या.
कळंबी येथे माजी सभापती सुभाष पाटील यांच्या एक हाती वर्चस्वाला भाजपाचे नेते अजित घोरपडे यांच्या विकास आघाडीने धक्का देत सत्ता पटकावली आहे. या ठिकाणी दादासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने ८ जागा मिळविल्या, तर माजी सभापती सुभाष पाटील यांच्या पॅनेलला अवघ्या ३ जागा मिळाल्या. शिपूर, चाबुकस्वारवाडी या ठिकाणी स्थानिक आघाडीने विजय संपादन केले.