नगर : नगर शहरात आणि राज्यातही भाजप-शिवसेना यांच्यामध्ये सध्या विळ्याभोपळ्याचे नाते असले, तरी या दोन्ही पक्षांचे जिल्ह्यातील खासदार मात्र नगर शहरात एकमेकांचे सख्खे शेजारी झाले आहेत. उत्तरेतील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे सरकारी कार्यालय शिर्डीऐवजी नगर शहरात सुरू केले आहे. तेही भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अगदी शेजारीच. खा. विखे यांनी त्यांचे सरकारी कार्यालय केव्हा सुरू केले याची माहिती नगरकरांना मिळाली नाही. मात्र खा. लोखंडे यांनी आज, शनिवारी कार्यालयाचे उद्घाटन केले. आता या दोन्ही खासदारांकडे येणाऱ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत पुन्हा युतीचा घरोबा निर्माण होणार का? हा औत्सुक्याचा विषय ठरेल.

भाजप खा. डॉ. विखे व शिवसेनेचे खा. लोखंडे या दोघांचेही सरकारी कार्यालये तंत्रनिकेतन विद्यालयाशेजारी (आनंदधामजवळ) सुरू करण्यात आली आहेत. पूर्वी या ठिकाणी केवळ तत्कालीन भाजप खासदार दिलीप गांधी यांचेच सरकारी कार्यालय होते. गांधी यांच्यासमवेत त्या वेळी लोखंडेही खासदार पदावर होते, मात्र त्यांनी त्या वेळी गांधी यांच्याशेजारी कार्यालय सुरू केले नाही. अर्थात हा दोन्ही पक्षांचा शहरातील वादाचाही परिणाम असावा. आता खा. विखे यांनी गांधी यांच्या जागेतच कार्यालय सुरू केल्यानंतर मात्र खा. लोखंडे यांनी लगेच त्यांच्या शेजारी कार्यालय सुरू करण्यास पसंती दिली. ही दोन्ही कार्यालये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ट्रायसेम प्रशिक्षण केंद्राच्या जागेत आहेत.

केंद्र सरकारने खासदारांसाठी सुविधा व संपर्क केंद्र सुरू करण्याची तरतूद केली आहे. त्यातून दोन्ही पक्षांच्या सख्ख्या शेजाऱ्यांची कार्यालय सुरू झाली आहेत. खा. लोखंडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

खा. लोखंडे यांनी मागील कार्यकाळात नगर शहरात सुविधा केंद्र सुरू केले नव्हते. यंदा मात्र ते केले आहे, हे विशेष. या वेळी बोलताना कोरगावकर म्हणाले की, लोखंडे यांच्या खासदार पदाचा उपयोग जिल्ह्याला व्हावा यासाठी, नगरमध्ये कार्यालय सुरू केले आहे. अपक्ष आमदार असलेले मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी त्यांनी शहरात कार्यालय सुरू केलेले नाही, याकडे उपस्थित काही पदाधिकारी लक्ष वेधत होते.

साईबाबा मंदिर  खुले व्हावे – खा. लोखंडे

शिर्डीतील साईबाबांचे मंदिर भाविकांसाठी खुले व्हावे अशी आपली ही भूमिका आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. परंतु मुख्यमंत्र्यांनी करोना संसर्गाची दक्षता म्हणून, भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी मंदिरे खुली केलेली नाहीत, असे खा. लोखंडे या वेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मी केवळ उत्तरेचा खासदार नाही तर जिल्ह्याचा खासदार आहे, म्हणून नगर शहरात कार्यालय सुरू केले असेही त्यांनी स्पष्ट केले.