भाजपानेही दावा केल्यामुळे अडचणीत भर

रवींद्र केसकर, उस्मानाबाद</strong>

उस्मानाबादकारांनी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खासदार रविंद्र गायकवाड यांच्या झोळीत भरभरून माप टाकले होते. यंदा मात्र सेनेला ही जागा राखण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. त्यात संघटनात्मक पातळीवर विस्कटलेली घडी हा सर्वात मोठा अडथळा आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बाजू तुलनेने भक्कम असून मागील निवडणुकीत सेनेसोबत असलेल्या भाजपानेही यंदा उमेदवारीसाठी केलेला दावा. त्यामुळे शिवसेनेला एकाचवेळी अनेक परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे. त्यात अंतर्गत धुसफुस रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान सेनेच्या उमेदवाराला पेलावे लागणार असल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार यंदा संसदेत आपला प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवणार, याबाबत आता चर्चा झडू लागल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील चार आणि सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक, असे सहा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व आहे. त्यात औसा आणि तुळजापूर या दोन मतदारसंघातील नेतृत्वाचा ताबा काँग्रेसकडे आहे, तर उस्मानाबाद-कळंब, भूम-परंडा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. केवळ उमरगा-लोहारा या मतदारसंघात शिवसेनेचा एकमेव आमदार आहे. तेथेही सध्या पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बळ वाढले आहे. त्यामुळे वरवरचे चित्र तरी सध्या आघाडीच्या बाजूने झुकलेले असल्याचे स्पष्ट आहे. उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील छुपी युती सर्वश्रुत आहे. एकमेकांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्हे, तर स्वपक्षीय असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला देखील ऐनवेळी टांग देण्याची परंपरा काँग्रेस पक्षाने सातत्याने पाळली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना मागील विधानसभा निवडणुकीत अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. याची जबाबदारी मात्र जिल्ह्यातील मातब्बर म्हणवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कधीच स्वीकारली नाही आणि पक्षीय पातळीवरूनही विचारणा झाली नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाददेखील काँग्रेसला सोसावे लागणार आहेत. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.