News Flash

छिंदम प्रकरणावरून शिवसेना-भाजप सदस्यांत खडाजंगी

सुमारे पंधरा मिनिटे हा गदारोळ सुरू होता. दोन्ही बाजूचे सदस्य हातवारे करत तावातावाने बोलत होते.

श्रीपाद छिंदमचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे सदस्य जिल्हा परिषदेच्या सभेत काळे उपरणे परिधान करून आले होते.

जिल्हा परिषदेच्या आज, गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. छिंदम याचा निषेध करणारा ठराव सर्वपक्षीयांनी मंजूर केला. मात्र या ठरावावरील चर्चेत भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत मोठी खडाजंगी उडाली. छिंदमचा निषेध करताना शिवसेनेच्या सदस्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका सुरू केली, त्याला भाजपच्या सदस्यांनी हरकत घेतली. त्यातून दोन्ही बाजूंनी खडाजंगी झाली.

सभा सुरू होताच नेवाशातील क्रांतिकारी शेतकरी दलाचे सुनील गडाख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल छिंदमच्या निषेधाचा ठराव मांडला. त्याला सर्वपक्षीयांनी संमती दिली. सभा सुरू झाल्यानंतर काहीशा दिरंगाईने शिवसेनेचे सदस्य काळे उपरणे घालून सभागृहात आले. नगर तालुक्याचे सभापती रामदास भोर यांनी छिंदमच्या निषेधाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न केल्यावर सदस्यांनी त्यांना ठराव संमत झाल्याची माहिती दिली. मात्र भोर यांनी भाजपच्या कोणत्याही आमदार, खासदाराने छिंदमचा निषेध केला नाही, छ. शिवाजी महाराजांच्या नावाने नरेंद्र मोदींनी मते मागितली होती, याकडे लक्ष वेधले. सेनेकडून मोदींचा उल्लेख होताच भाजप सदस्यांनी त्याला हरकत घेतली.

भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी छिंदमविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्हीच केली, त्याला पक्षातून निलंबित केले, छिंदमची बाजू कोणी घेणार नाही, असे सांगितले. सेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी, सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याने भाजपवाले मस्तवाल झाल्याचा आरोप केला. त्यातून एकच गदारोळ सुरू झाला. संदेश कार्ले यांच्या वक्तव्याने त्यात भर पडली. भाजपपैकी वाकचौरे, कांतिलाल घोडके अधिक आक्रमकपणे बाजू मांडत होते. इतर सभांतून आम्ही विकासाचे विषय उपस्थित केले की अध्यक्ष विखे आम्हाला बोलू देत नाहीत, आता विशेष सभा जणू भाजपविरोधात बोलण्यासाठीच आयोजित केल्याचे दिसते, असा टोला त्यांनी विखे यांना लगावला.

सुमारे पंधरा मिनिटे हा गदारोळ सुरू होता. दोन्ही बाजूचे सदस्य हातवारे करत तावातावाने बोलत होते. छत्रपती सर्वाचेच होते, त्यामुळे सभागृहात पक्षीय चर्चा करू नये, असे सांगत राजेश परजणे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र कराळे यांनी आम्हीही सभागृहाचे सदस्य आहोत असे सांगत पुन्हा भाजपला लक्ष्य केले. दोन्ही बाजूचे सदस्य परस्परांना हिणवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर सेना-भाजपचे सदस्य स्वत:हूनच शांत झाले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:22 am

Web Title: bjp shiv sena workers clash over ex dy mayor shripad chhindam issue
Next Stories
1 उदयनराजेंच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेते
2 भाजपच्या खासदार, आमदारांमध्ये संघर्ष
3 विदर्भात पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण रखडले
Just Now!
X