अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. भाजप-शिवसेना-राष्ट्रीय समाजवादी पक्ष आघाडीला केवळ २ जागा मिळाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून अंकुशराव टोपे व आमदार राजेश टोपे यांच्या अधिपत्याखाली असणारी ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी या वेळी भाजप-शिवसेना युतीने प्रयत्नांची पराकाष्टा केली होती.
राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. भाजपचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे, हिकमत उढाण यांच्यासह इतर पुढारी भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार शुभारंभास उपस्थित होते. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या विजयी उमेदवारांत काँग्रेस जिल्हाध्यक्ष डोंगरे, केदार कुळकर्णी, भैया हातोटे यांचा समावेश आहे. भाजप-शिवसेना-रासप युतीकडून अवधूत खडके आणि श्रीमंत खरात हे दोन उमेदवार निवडून आले.
मतदारांनी विकासात्मक भूमिका घेणाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे निकालावरून स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया आमदार टोपे यांनी या संदर्भात व्यक्त केली. धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशीच ही निवडणूक झाली. विकासाची कामे करण्याची क्षमता कुणात आहे, याचा निकाल मतदारांनी दिला. निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्नही आमच्या विरोधकांनी केला, परंतु मतदार त्यास बळी पडले नाहीत, असेही टोपे म्हणाले.
डोंगरे यांनी सांगितले, की शेतकरी व सर्वसामान्य जनतेने भाजप-शिवसेनेविरुद्ध दिलेला हा कौल आहे. अंबड बाजार समितीचे कार्यक्षेत्र भाजप खासदार व आमदारांच्या मतदारसंघात येते. अशा स्थितीतही अंबड बाजार समिती त्यांना ताब्यात घेता आली. मतदार व कार्यकर्ते कोणत्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहिले म्हणून आमचा विजय झाला.