केंद्रात स्थिर सरकार आले, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तशाच प्रकारे महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र आले पाहिजे आणि ते एकत्र येणारच, असा ठाम विश्वास भय्यूमहाराज यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
परभणीत कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. विकासासाठी स्थिर सरकार गरजेचे आहे. मागील १० वर्षांत केंद्रात व राज्यात असणारे सरकार अस्थिर स्वरूपाचे होते. त्यामुळे भ्रष्टाचाराला ऊत आला आणि देशाचा विकासही रखडला. आता मात्र केंद्रात स्थिर सरकारमुळे सहा महिन्यांतच चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे सांगून महाराष्ट्रातही स्थिर सरकारची आवश्यकता आहे, असे मत भय्यूमहाराजांनी व्यक्त केले.
शिवसेना-भाजपला १५ वषार्ंनंतर सत्तेची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्यात रुसवे-फुगवे असणारच. उशिरा लग्न झालेल्या दाम्पत्यांची अवस्था असते तशीच सध्या दोन्ही पक्षांची अवस्था झाली आहे. काही झाले तरी हे दोन पक्ष लवकरच एकत्र येणार हे निश्चित आहे, असा दावा भय्यूमहाराजांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची कामगिरी सध्या तरी समाधानकारक आहे. शिस्त व अनुशासनाची जोड यामुळे लोकसहभागाची भावना निर्माण झाली आहे. लोक नराश्यातून बाहेर पडू लागले आहेत, असेही ते म्हणाले.
धर्माचे बाजारीकरण झाल्याने या क्षेत्रात काही कलंकित घटना घडत आहेत. धर्मासाठी माणूस नसून माणसासाठी धर्म आहे, असे सांगून संत हे समाजाला उत्तरदायित्व असतात, असे त्यांनी सांगितले. सरकारने राजकीय पेच सोडवून तत्काळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही भय्यूमहाराजांनी या वेळी केली. सद्गुरू दत्त ट्रस्टच्या वतीने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी त्यांनी दिली. आतापर्यंत १ हजार ७०० तलाव बांधण्यात आले. २३ हजार मुलींचे विवाह, २१ लाख झाडे, ३० हजार शेतकऱ्यांना बियाणे वाटप, ५ हजार पाण्याच्या टाक्या असे उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडय़ात सिंचन क्षेत्र वाढल्याशिवाय दुष्काळ हटणार नाही. त्यासाठी सर्व जमिनी ओलिताखाली आल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांसह माध्यमांवर आक्रमकतेने ओरडण्यापेक्षा तेवढय़ाच वेगाने कार्य करा, असा सल्ला भय्यूमहाराजांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दिला.