08 July 2020

News Flash

गायकवाड यांच्या उमेदवारीचा ‘पोपट तेव्हाच मेला होता’!

गायकवाड मात्र आपले तिकीट नाकारले हे आपल्यावर अन्याय करणारे असल्याचे मत व्यक्त करतात.

खासदार सुनील गायकवाड

प्रदीप नणंदकर, लातूर : लातूरमध्ये भाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा सुरू होता. मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘यहाँ के लोकप्रिय सांसद’ त्यांच्या या वाक्यावर कार्यकर्ते हसले. त्यांना खासदारांची लोकप्रियता कळली आणि ते म्हणाले, ‘मुझे जो लिख कर दिया है वो मैं पढ रहा हूँ, मुझे क्या पता है’? कार्यकर्त्यांच्या हसण्यातून मिळालेल्या संदेशातच खासदार सुनील गायकवाड यांच्या उमेदवारीचा पोपट मेला होता, अशी चर्चा आता लातूरमध्ये रंगली आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आलेल्या डॉ. सुनील गायकवाड यांना उमेदवारी नाकारून भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सुधाकर शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गायकवाड यांची उमेदवारी नाकारण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगण्यात येते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा संपर्क नव्हता. त्यांनी कधी ‘जॅकेट’ काढलेच नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. यांना उमेदवारी द्या, असे म्हणणारी एकही व्यक्ती लातूरमध्ये नव्हती. परिणामी गायकवाड यांच्याऐवजी शृंगारे यांचे नाव चर्चेत आले.

२००९च्या निवडणुकीच्या तोंडावर गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळविला व त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. काँग्रेसकडून त्यावेळी तत्कालीन प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे रिंगणात होते. त्या निवडणुकीत गायकवाड यांचा निसटता पराभव झाला. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जोरदार मते घेतली होती. दुसऱ्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आणि गायकवाड प्रचंड मताने विजयी झाले. त्यांची लोकसभेतील कामगिरी चांगली राहिली. मात्र, मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, आमदार अशा मंडळींशी फारसे सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. दरवर्षी त्यांच्या नाराजीत भरच पडत गेली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यापासून ते लातूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यापर्यंत गायकवाडांचे मतभेद तीव्र होत गेले. नंतर त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले होते अन् त्यामुळेच त्यांचे तिकीट कापले गेले.

गायकवाड मात्र आपले तिकीट नाकारले हे आपल्यावर अन्याय करणारे असल्याचे मत व्यक्त करतात. पक्ष हा सर्व कार्यकर्त्यांचा असतो. एखाद्या व्यक्तीने आडमुठी भूमिका घेतली म्हणून त्याच्या भूमिकेवर पक्ष चालवणे हे योग्य नाही. मी म्हणजे भाजप असे वातावरण निर्माण काही जण करीत आहेत. त्यांचा भ्रमनिरास झालेला दिसून येईल. मी भाजपमध्येच राहणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन. आतापर्यंत आपण सरळमार्गी राहिलो. आता राजकारण काय असते, हे उमगले. त्यामुळे मीही ते प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

सुधाकर शृंगारे कोण?

लातूर जिल्हय़ातील चाकूर तालुक्यातील घरणी येथील शेतकरी कुटुंबातील सुधाकर शृंगारे व्यवसायासाठी  मुंबईला गेले. बांधकाम क्षेत्रात त्यांचे नाव मोठे आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी चाकूर तालुक्यातील वडवळ गटातून निवडणूक लढवली. ते चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते जिल्हय़ात चांगलेच रमले.  लोकसभा लढवण्याची इच्छा त्यांच्या मनात वाढू लागली. त्यांनी जिल्हाभरातील पक्षातील व समाजातील सर्व स्तरात जवळीक साधणे सुरू केले. अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग दिला. ‘व्यक्तिगत मला काही नको. सत्तेच्या माध्यमातून समाजासाठी काही चांगले करता यावे याच उद्देशाने आपल्याला खासदार व्हायचे आहे’, असे शृंगारे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2019 2:30 am

Web Title: bjp sitting mp sunil gaikwad denied tickets for lok sabha elections 2019
Next Stories
1 किस्से आणि कुजबुज : दोन गायकवाडांना ‘नारळ’
2 अमरावतीत दुर्मीळ ऑस्ट्रेलियन ‘शेकाटय़ा’ पक्ष्याची नोंद
3 चारुलता टोकस यांच्यासमोर इतिहासाच्या पुनरावृत्तीचे आव्हान
Just Now!
X