03 June 2020

News Flash

भाजपची ‘स्मार्ट’ खेळी

आपला बालेकिल्ला कायम राखण्याकरिता राष्ट्रवादीने दोर लावला आहे.

पालिका निवडणूक पश्चिम महाराष्ट्र

केंद्र व राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपने सोलापूर जिल्ह्य़ातील नगरपालिकांची सत्ता मिळविण्याकरिता जोरदार प्रयत्न सुरू केले असून,  ‘स्मार्ट सिटी’चे प्रत्येक ठिकाणी गाजर दाखवून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे आपला बालेकिल्ला कायम राखण्याकरिता राष्ट्रवादीने दोर लावला आहे.

बार्शीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल व त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात कडवी झुंज पाहावयास मिळत आहे. यातच भाजपने उद्योगपती राजेंद्र मिरगणे यांच्या माध्यमातून आपली ताकद वाढविली आहे. मिरगणे यांनाच नगराध्यक्षपदासाठी भाजपने निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बार्शीत प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीत जातीची समीकरणे महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जाते. शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी अ‍ॅड. आसिफ तांबोळी यांची उमेदवारी आणली असताना त्यांना मुस्लिमांसह मराठा समाजाची मते मिळवून देण्यासाठी गणित जुळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न चालू आहे. तर राष्ट्रवादीची मदार लिंगायत समाजासह दलित व अन्य समाजावर अवलंबून आहे.

पंढरपूर येथे परिचारक आणि भालके असा परंपरागत संघर्ष आहे. राष्ट्रवादीपासून काडीमोड घेऊन भाजपप्रणीत महायुतीशी सलगी केलेले माजी आमदार सुधाकर परिचारक व त्यांचे पुतणे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक आणि काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यात कडवी झुंज आहे. सध्या तरी पंढरीत राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसत नाही. परिचारक व भालके यांचीच लढाई प्रतिष्ठेची समजली जाते. अक्कलकोटमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे लक्ष ठेवून असल्याने तेथील लढाई भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी अक्कलकोटमध्ये प्रचारसभा घेऊन प्रचारयंत्रणा भक्कम केली, तरी तेथील भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपपासून दूर जात राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी सलगी केली आहे. भाजपची ही अडचण ठरली असली, तरी सिद्रामप्पा पाटील यांना बाजूला ठेवून दुसऱ्या फळी सक्रिय केली आहे.  करमाळा व कुडरूवाडी येथे राष्ट्रवादीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. तर सांगोल्यात शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून माजी आमदार अ‍ॅड. शहाजी पाटील हे जोरदार प्रयत्न करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2016 1:32 am

Web Title: bjp smart step in western maharashtra municipal elections
Next Stories
1 नाव पक्षाचे, राजकारण मात्र आघाडय़ांचे!
2 कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचा उलटा प्रवास
3 चंद्रपूर जिल्हा बँकेची २५ लाखांवर बोळवण!
Just Now!
X