राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षात सध्या राजीनामासत्र सुरु आहे. दरम्यान भाजपाचे ननविर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांन काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या आठवड्यात हे आमदार राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आमदारांची नावं सांगणं मात्र टाळलं. नावं सांगितली तर सगळी मजा संपेल. त्यामुळे ही नावं सध्या तरी गुलदस्त्यात राहू देत असं सांगताना येणाऱ्या आठवडात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देतील हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. आगामी काळात या नेत्यांची नावं समजतील असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला असून ते राजीनामा देऊन हातपाय गाळत आहेत असा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला. याआधी प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एखादा भाजपामध्ये सहभागी झाला तर आश्चर्य वाटायला नको असं म्हटलं होतं.

प्रदेशाध्यक्षपदाला मी पद नाही तर जबाबदारी म्हणतो. तसेच आगामी निवडणुकांमध्ये राज्यात युतीची सत्ता आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. राज्यातील २२७ जागांध्ये युती पुढे आहे. ती संख्या वाढेल पण कमी होणार नाही. निवडणुकीचा निकाल ही केवळ औपचारिकता असल्याचंही ते म्हणाले होते.