महाराष्ट्रात युतीला 42 जागांपेक्षा जास्त जागा मिळतील आणि देशात 300 जागांचा आकडा पार करुन भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

मी देशाचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं. कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर, पण जनता भरकटली नाही. राज्यातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता, असं रावसाहेब दानवे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. ‘महाराष्ट्रात युतीला 42च्या वरच जागा मिळतील, 41 होणार नाहीत. तसंच देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल’, असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला आहे. याशिवाय, शिवसेना आणि भाजपामध्ये आता छोटा भाऊ-मोठा भाऊ असा कोणताही प्रकार राहिला नसल्याचं सांगताना, ‘आमची मने मिळाली आहेत आणि हेच विधानसभेत पुन्हा दिसेल’ असं दानवे म्हणाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या, दोघांना मिळून एकूण 42 मिळाल्या होत्या.  तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा आणि काँग्रेसला केवळ 2 जागा्ंवर समाधान मानावं लागलं होतं. पण, यावेळेस मोदी लाट नसल्यामुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांमुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, आतापर्यंत राजकीयदृष्ट्या जो अभ्यास झाला आहे त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि 4 जागांच्यावर गेलेली नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून 5 जागांच्यावर जाणार नाहीत, असा विश्वासही यावेळी दानवेंनी व्यक्त केला आहे.

 

लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.