“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामुळे करोनाची लस किंवा इतर कोणत्याही कार्यासाठी निधी कमी पडू दिला नाही. उलट मुंबईतील मनोरा आमदार निवासाची साधी विटही महाविकास आघाडी सरकारला गेल्या दीड वर्षात लावता आलेली नाही.”, अशी टीका भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.

शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यावर विक्रांत पाटील यांनी प्रयुत्तर दिले आहे. करोना काळातही सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल मोदींना लक्ष्य करताना हर्षल प्रधान यांनी तेवढ्याच पैशात देशातील नागरिकांना करोनाची लस देता आली असती, असे म्हटले होते.

यावर प्रत्युत्तर देताना विक्रांत पाटील म्हणाले की, “करोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केली की वाहवा मिळते, अशी धारणा आघाडी सरकारमधील सगळ्यांची झाली आहे. मोदी सरकारने राज्यातील करोना रुग्णांसाठी कोट्यवधी रुपयांची मदत दिली आहे. तसेच, तुम्ही करोना हाताळण्याच्या श्रेयासाठी आकडेवारीची बनवाबनवी करून कशी स्वत:ची स्तुती करत आहात. खतांच्या दरवाढीवरून मोदींना लक्ष करीत आहात. मात्र शेतकऱ्यास फटका बसू नये म्हणून खतांच्या खरेदीवर मोदी सरकारने सबसिडी दिली आहे.”, असा दावाही पाटील यांनी केला.

“पेट्रोल, डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असल्याची इतकी चिंता राज्यातील महाविकास आघाडी सरकारला असेल तर त्यांनी या दोन गोष्टींवर असलेला ‘राज्याचा कर’ १० रुपयांनी कमी केला तर किंबहुना राज्यातील जनतेला मोठा दिलासा आपणास देता येईल”, असा सल्लाही विक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात दिला आहे.