News Flash

“मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाहीये”, मुनगंटीवारांचा शरद पवारांवर निशाणा!

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची एक बैठक झाल्याच्या पार्श्वभूमीवर यातून अनेक अर्थ काढले जात आहेत. या बैठकीमध्ये भाजपविरोधी पक्षांना एकत्र करून मोदींविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवार करत असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आमदार सुधीर मुनगंटीवारांनी नाव न घेता थेट शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरच निशाणा साधला आहे. तसेच, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जनता आहे, तोपर्यंत त्यांचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

…तर मोदींशी तुलना होऊ शकेल!

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पवार कुटुंबाकडे टीकेचा रोख वळवत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच लक्ष्य केलं. “एकत्र येऊन मोदींना विरोध करणं अशा लोकांना कधीही जनता साथ देत नाही. अशा कोणत्याही नेत्याला यश येत नाही. त्यांना मोदींचा मुकाबला करायचा असेल, तर जिथे त्यांची सत्ता आहे, तिथे कृती करून दाखवा. मॉडेल राज्य बनवून दाखवा. तर मोदींशी तुलना होऊ शकेल”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

सरकार आहे की, तमाशा; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले

…तोपर्यंत कुणी काही बिघडवू शकत नाही!

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी मोदींना विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष वा नेत्यांना थेट इशाराच दिला आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीवरून भूमिका मांडली आहे. “मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाहीये. आपल्या मुलीला खासदार किंवा मोठा नेता करायचं नाहीये. आपल्या नातवाला आमदार करायचं नाहीये. त्यामुळेच देश माझा परिवार या भावनेने काम करणाऱ्या नेत्याच्या समोर सगळे पक्ष एकत्र आले, इतर देशांतले मोदींचा हेवा करणारे एकत्र आले, तरी जोपर्यंत जनता सोबत आहे, कुणी काही बिघडवू शकत नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले.

 

आम्ही आमच्याकडून तरी त्यांना मित्रच समजतो!

दरम्यान, सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याविषयी देखील मुनगंटीवारांनी यावेळी भाष्य केलं. “लोकसभेच्या निवडणुकांआधी काही महिन्यांपूर्वी त्यांनी घोषणा केली होती की आम्ही २५ वर्ष भाजपासोबत सडलो, पण आता सडणार नाही. तरी आम्ही पुढाकार घेतला. लोकसभेत आम्ही त्यांच्यासोबत युती केली. विधानसभेतही युती केली. त्यामुळे आमच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. जे पक्ष देशहितासाठी आणि हिंदुत्वासाठी काम करतात, त्या पक्षांना आम्ही आमच्याकडून तरी मित्र समजतो”, असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेसोबत देखील मैत्रीचे सूतोवाच दिले.

 

हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार!

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी भाजपामधील आमदार, नगरसेवक फोडले जाण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. “अनेक दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस भाजपाचे आमदार फोडतील अशा बातम्या बघितल्या. एक आमदार फोडला नाही. आता ते नगरसेवक फोडून दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर निवडणुका असताना काही लोकांना असं वाटतं की या काळात भाजपाचं तिकीट आपल्याला मिळू शकणार नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांआधी काही लोक पक्षप्रवेश करतात. असे लोक जात असतील, तर यात भाजपाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. हा पक्ष नगरसेवक-आमदारांचा नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षाचा आत्मा कार्यकर्ता आहे”, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 7:21 pm

Web Title: bjp sudhir mungantiwar targets ncp chief sharad pawar on anti bjp alliance pmw 88
Next Stories
1 नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
2 नागपूरसह राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर!
3 भाजपात प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांचं पद धोक्यात?
Just Now!
X