News Flash

परभणीतील नव्या राजकीय समीकरणाने राष्ट्रवादीची खेळी फसली

शिवसेना महापौर-उपमहापौर च्या निवडीवेळी तटस्थ राहील हे अपेक्षीतच होते.

भाजपने ऐनवेळी काँग्रेसला साथ दिल्याने राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फिरले.

शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षात उभे राहिलेले दुफळीचे चित्र, राष्ट्रवादीने अपक्ष मुस्लिम उमेदवार महापौरपदासाठी उतरवून निर्माण केलेली राजकीय खेळी आणि बहुमताचा आकडा गाठण्यात असलेले अडसर अशा सर्व प्रतिकुल बाबींवर मात करीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी महापौरपदावर निर्वविाद वर्चस्व प्रस्थापित केले. उपमहापौरपदही काँग्रेसकडेच  ठेवून वरपुडकरांनी आपल्या राजकीय विरोधकांना शह दिला.श्रीमती मिनाताई सुरेश वरपुडकर या महापौर तर सय्यद समी सय्यद साहेबजान यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यामुळे  महापौर – उपमहापौर पदावर काँग्रेसचे उमेदवार विजयी करून वरपुडकरच महापालिकेच्या राजकारणात ‘बाजीगर’ ठरले. भाजपने ऐनवेळी काँग्रेसला साथ दिल्याने राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फिरले.

काँग्रेस३१, राष्ट्रवादी १८ , भाजपा ८ शिवसेना ६ व अपक्ष २ असे महापालिकेत संख्याबळ झाले. सर्वाधिक काँग्रेसचे ३१ सदस्य असल्यामुळे दोन अपक्षांचा पािठबा मिळवत काँग्रेस एकहाती सत्ता हाती घेईल असे सुरूवातीचे चित्र होते. परंतु राष्ट्रवादीने सुरूवातीलाच एक अपक्षाला आपल्या गोटात घेऊन काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. काँग्रेस मुस्लिम महापौर करीत असेल तर आम्ही काँग्रेसला बिनशर्थ पािठबा देण्यास तयार आहोत असे जाहिर करून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण करण्यात सुरुवातीला यशस्वी झाले. महापौरपदावरून जिल्हाध्यक्ष वरपुडकर व जेष्ठ नगरसेवक विखारलाला यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र होते. गेल्या १५ दिवसात काँग्रेस पक्षात महापौर पदावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. महापौर निवडीच्या पुर्वसंध्येपर्यंत काँग्रेसमधील संघर्ष कायम असल्याने महापौर – उपमहापौरपदाच्या निवडीवेळी प्रत्यक्षात काय घडेल याबाबत सर्वानाच उत्सुकता होती.

शिवसेना महापौर-उपमहापौर च्या निवडीवेळी तटस्थ राहील हे अपेक्षीतच होते. शिवसेनेची ही भूमिका काँग्रेस पुरक होती. शिवसेनेच्या तटस्थ भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या मुस्लिम महापौर करण्याच्या मनसुब्यावर कालच पाणी फिरले होते. भारतीय जनता पक्ष सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देईल अशी चर्चा कालपासून सुरू होती. या चच्रेप्रमाणेच आज महापौरपदाच्या उमेदवार श्रीमती मिनाताई सुरेश वरपुडकर यांना भाजपाच्या आठही सदस्यांनी मतदान केले. महापौर निवडीनंतर झालेल्या उपमहापौर निवडीच्या वेळी सभागृहात व सभागृहाबाहेर वेगळेच चित्र पहावयास मिळाले.  महापौरपदासाठी भाजपाचा पाठिंबा घेताना वरपुडकरांनी त्यांना कुठला शब्द दिला होता हे मात्र शेवटपर्यंत उघड झाले नाही. भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी काँग्रेसला पाठिंबा दिला त्याबदल्यात काँग्रेसकडून उपमहापौरपदाचा सत्तेत वाटा मिळेल असे भाजपला वाटले होते. मात्र काँग्रेसच्या वरपुडकरांनी माजुलाला यांना उपमहापौरपदी बसवून शहरातील मुस्लीम समुहाला सत्तेत वाटा दिला आहे.

आज महापौर-उपमहापौर निवडीवेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकत्रच सभागृहात दाखल झाले. त्याचवेळी पक्षातले अंतर्गत मतभेद मिटल्याचे स्पष्ट झाले. महापौरपदासाठी दुसरे प्रबळ दावेदार असलेले विखार अहेमद खान यांना परभणी विधानसभा मतदार संघाची पक्षाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला गेल्याने त्यांनी माघार घेत वरपुडकरांना सहकार्य केले अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. स्वतच्या पक्षांतर्गत विरोधकांना सामावून घेत राजकीय विरोधकांना शह देण्याची वरपुडकरांची खेळी यानिमित्ताने यशस्वी झाली आहे.

सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू- वरपुडकर

परभणीकर जनतेने काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कौल दिला. आम्ही बहुमताच्या जवळ जावून पोहचलो होतो. राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांनी काँग्रेसला विरोध करण्याचे ठरवले होते. त्यामुळे बहुमत गाठण्यात अडसर होते. मात्र हे सर्व अडसर दूर झाले. जनतेने निवडणुकीत आमच्याच बाजुने कौल दिला होता. त्यामुळे काँग्रेसचाच महापौर व उपमहापौर होणे हे या जनमताच्या कौलाला अनुसरुनच आहे अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. वरपुडकर यांनी सर्वसामान्य जनतेचे आभार मानले. शहरात विकासाची कामे हाती घेण्यात येतील आणि पक्षीय विरोध मनात न ठेवता विकासाच्या मुद्यावर सर्वाना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे  वरपुडकर म्हणाले.

महापौरपदासाठी व्हिप नव्हता-भरोसे

महापौर व उपमहापौर निवडीत भारतीय जनता पक्षाची भूमिका संदीग्ध राहिली. भाजपने महापौरपदासाठी काँग्रेसच्या पारडय़ात आपले मतदान टाकले तर उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेसच्या विरोधात स्वतचा उमेदवार दिला. या पाश्र्वभूमिवर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरेसे यांना विचारले असता त्यांनी पक्षाचा व्हिप उपमहापौरपदासाठी मतदान करण्यासंदर्भातलाच होता. महापौरपदाच्या निवडीत पक्षाने कोणताही व्हिप बजावलेला नव्हता. महापौर निवडताना सभागृहात गटनेत्यांने प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेतलेला आहे. याबाबत गटनेतेच अधिक सांगू शकतील असेही भरोसे म्हणाले.

भाजपच्या पाठिंब्याचे गुपित

शिवसेनेच्या तटस्थ भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या मुस्लिम महापौर करण्याच्या मनसुब्यावर कालच पाणी फिरले होते. भारतीय जनता पक्ष सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देईल अशी चर्चा कालपासून सुरू होती. या चच्रेप्रमाणेच आज महापौरपदाच्या उमेदवार श्रीमती मिनाताई सुरेश वरपुडकर यांना भाजपाच्या आठही सदस्यांनी मतदान केले.   महापौरपदासाठी भाजपाचा पाठिंबा घेताना वरपुडकरांनी त्यांना कुठला शब्द दिला होता हे मात्र शेवटपर्यंत उघड झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:33 am

Web Title: bjp support congress for mayor in parbhani
Next Stories
1 जयंत पाटील यांचे पंख कापण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न
2 पश्चिम विदर्भ राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान
3 ..अन् लग्नाच्या मांडवातून वरातीऐवजी निघाली ‘ती’ची अंत्ययात्रा
Just Now!
X