विधानपरिषद निवडणुका होण्यापूर्वी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या ११ वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले आणि पंकजा मुंडे ज्यांना भाऊ मानतात असे रमेश कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. रमेश कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. बुधवारी म्हणजेच आज रमेश कराड राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतील पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

डॉ. वि. दा कराड यांचे पुतणे रमेश कराड यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच सुरु झाली होती. मात्र १२ वर्षांपूर्वी रमेश कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. उस्मानाबाद लातूर बीडचे विधानपरिषदेचे आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. ही जागा तीन टर्म देशमुख यांनी अबाधित ठेवली होती. मात्र नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांनी ही जागा सोडली. रमेश कराड हे याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक कराड नाणेफेकीत हरले. विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी दिली जावी या मताशी पंकजा मुंडे सहमत नव्हत्या अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांचा अपवाद वगळता रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही सलोख्याचे नाते नाही. त्याचमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांचे मन वळवले आहे अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे. धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादीची वाट धरली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे नाते बहिण भावाचे. मात्र दोघांमधल्या नात्याची जागा राजकीय मतभेदांनी घेतली. आता पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू रमेश कराडही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा धक्काच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.