News Flash

सोलापुरात भाजपमध्ये जल्लोष अन् अस्वस्थताही

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सोलापूरकरांचे अधिक लक्ष होते.

सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

सोलापूर : सोलापूरचे सांस्कृतिक संबंध असलेल्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सकाळी भाजपने आघाडी घेत असताना इकडे सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र दुपारनंतर सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा जादुई आकडा गाठता आला नसल्याचे दिसून येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सोलापूरकरांचे अधिक लक्ष होते. निवडणुकीचे कल जाहीर होऊन भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येताच शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजवाडे चौकात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन जल्लोष केला. या वेळी स्वत: पालकमंत्री देशमुख यांनीही डोक्यावर भगवी टोपी परिधान करून उत्साहाने जल्लोष करीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पेढे भरविले.

महापालिका सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह अन्य  कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. खूप वेळ हा जल्लोष चालू होता.

तथापि, दुपारी हळूहळू कर्नाटकातील राजकीय परिस्थिती बदलली आणि भाजपने घेतलेल्या जागांच्या आघाडीत घट होऊन १०४ पर्यंत जागांचा आकडा स्थिरावला. बहुमतासाठी ९ जागा कमी पडल्या. दुसरीकडे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तास्थापनेचा दावा करू लागले. तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली.

सहकारमंत्री देशमुख खूश

बेळगाव-निपाणी परिसरात भाजपच्या विजयासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दौरे करून जातीने लक्ष घातले होते. पक्षाला यथाशक्ती ‘रसद’ही पुरविली होती. निवडणूक निकाल जाहीर होऊन त्यात बेळगाव भागात भाजपने बाजी मारल्याचे समजताच सहकारमंत्री देशमुख हे खूश झाले. त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

सांगली-मिरजेतही उधाण

 सांगली : कर्नाटकमध्ये भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल सांगली-मिरज शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. सांगली शहरातील राममंदिर चौक आणि मिरज शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये फटाके फोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

राम मंदिर चौकामध्ये माजी उपमहापौर शेखर इनामदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विजयाच्या घोषणा देत फटाके वाजविले. या वेळी आ. सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत ढोलताशा वाजवून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी आ. गाडगीळ यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना साखर वाटली. या वेळी श्रीकांत िशदे, मुन्ना कुरणे, शरद नलवडे, मद्रासी आदी उपस्थित होते.

मिरजेच्या लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या महाराणा प्रताप चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करीत पेढे वाटले. देश गतीने काँग्रेसमुक्तीकडे वाटचाल करीत असल्याच्या भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

सीमाभागात भाजपच्या प्रचारासाठी सांगलीच्या भाजपमधील ज्येष्ठ कार्यकत्रे गेले होते. यामध्ये पक्षाचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, दीपक शिंदे यांचा समावेश होता.

कोल्हापुरात आनंदोत्सव

कोल्हापूर  : भाजपचे कमळ  फु लल्याने मंगळवारी भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरेही फुलले होते.  कोल्हापूर  जिल्हा भाजपाच्या वतीने शिवाजी चौक येथे ढोल ताशाच्या निनादात  साखर पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मोदीनामाचा गजर  करत देशात पुन्हा भाजपचेच राज्य येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत येथील  भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली होती . त्यामुळे या निवडणुकीतील निकालाकडे सकाळपासूनच लक्ष होते. सुरुवातीचे निकाल काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसू लागल्याने निराशा जाणवत होती, पण थोडय़ाच वेळात या दक्षिणी राज्यात कमळ  फुलू लागल्याने कार्यकर्त्यांंचे चेहरेही फुलले. शंभराहून अधिक उमेदवार विजयाकडे कूच करत असल्याचे स्पष्ट झाल्यावर जिल्हा कार्यालयातील जल्लोष भर रस्त्यावर आला .

शिवाजी चौक येथे ढोल ताशाच्या निनादात  साखर पेढे वाटण्यात आले .  फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ताल धरला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी २०१९ मध्ये  भाजपच सत्तेवर येणार असा विश्वास व्यक्त केला. नरेंद्र मोदींची लाट देशात असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला .  जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी,  प्रचाराच्या काळात पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. त्यामुळे हा विजय त्यांचा असल्याचे सांगितले. या वेळी अशोक देसाई, आर. डी. पाटील, सुरेश जरग, प्रभावती इनामदार, जयश्री जाधव, नचिकेत भुर्के, नझीर देसाई, किरण कुलकर्णी,अक्षय मोरे, प्रसाद मोहीते, गुलाब मुल्ला, दिग्वीजय कालेकर,  विवेक कुलकर्णी, सविता भालकर, गायत्री राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जनहिताच्या मुद्दय़ावर  मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा  निकाल विरोधकांची आशा फोल ठरवणारा आहे. निवडणूक कशी लढवावी, हे इतरांनी अमित शहांकडून शिकावे, असा टोला  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांनी २०१९ च्या निवडणुकीत आपला वेळ आणि खर्च न करता २०२४ च्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवावा, अशी कोपरखळी त्यांनी मारली. जनतेने जातीयवादाला थारा न देता जनहिताच्या मुद्दय़ावर  मतदान केले आहे. दलित आणि मुस्लिम मतदार भाजपसोबत नाहीत हे विरोधकांचे दावे चक्क फोल ठरले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:05 am

Web Title: bjp supporters in solapur celebrate after early trends predict a massive win
Next Stories
1 खामगांवमध्ये दोन गटांत हाणामारी
2 हप्तेखोरीसाठी दंगल घडवली ; धनंजय मुंडे यांचा आरोप
3 मराठीला अभिजात दर्जा, वाचन संस्कृतीसाठी साहित्य महामंडळ सरकारशी भागीदारीस तयार
Just Now!
X