News Flash

मुलीने केला प्रेमविवाह; भाजपाच्या तालुकाध्यक्षांचा जावयावर खुनी हल्ला

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना; दिली होती सुपारी

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे.

प्रेमविवाह केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून भाजपाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, हृषीकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे बीड जिल्ह्यतील शिरूर येथील आहेत. त्यांच्याकडून एक मोटार, एक पिस्तूल, एक एअरगन, चाकू, गुप्ती आदी हत्यारे जप्त केली आहेत. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे. माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ व हृषीकेश खेडकर हे फरार आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नेवासा महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बंटी उर्फ प्रशांत राजेंद्र वाघ यांचे व लातूरला बीएएमएसच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या पाथर्डीतील ऋतुजा माणिक खेडकर यांचे प्रेम होते. घरच्यांनी आंतरजातीय विवाहाला विरोध केला होता. त्याला न जुमानता ऋतुजा व बंटी यांनी एक मार्च रोजी विवाह केला. विवाहाला विरोध असल्याने वडील खेडकर यांनी जावई बंटी याला धमकी दिली होती. नेवाशातील कडूगल्लीत दुपारी बंटी याच्या घरी चार वाहनातून खेडकर हे लोक घेऊन आले. वाघ कुटुंबीयांना त्यांनी मुलगी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. नंतर बंटी याच्यावर एकाने गुप्तीने हल्ला केला. पण त्याने वार चुकविला. बंटी याने आरडाओरडा केला. त्या वेळी एकाने त्याच्यावर पिस्तूल रोखले. हा गोंधळ सुरू असताना गल्लीत लोक जमा झाले. काहींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जमाव जमल्यानंतर आरोपी पळून गेले.

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी त्वरित नेवाशातून जाणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी केली. तसेच स्वत: दुचाकीवर आरोपीचा पाठलाग केला. शेवगाव रस्त्यावर भानसहिवरा शिवारात तीन मोटारीसह सात जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात बंटी उर्फ प्रशांत वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 11:00 am

Web Title: bjp taluka president attack son in law after daughter marriage bmh 90
Next Stories
1 महिलांनो, तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; राज ठाकरेंचा ‘स्त्रीशक्ती’ला मोलाचा सल्ला
2 राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; सरकारसमोर उत्पन्न वाढीचं आव्हान
3 Video : महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा खास संदेश; जनतेला केलं आवाहन
Just Now!
X