अशोक तुपे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी असलेले सख्य, राज्याच्या राजकारणातील दबदबा तसेच मतदारसंघावरील पकड असलेले माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड या पिता-पुत्रांनी अडचणींमुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. धनगर आरक्षणाला आदिवासींचा असलेला विरोध कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र स्थानिक विरोधक एकवटल्याने पिचड यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक सदस्य आहे. पक्ष व शरद पवारांवर माझी अतिव श्रद्धा आहे. कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार या जन्मात डोक्यात येणार नाही, असे एप्रिल महिन्यात माजी मंत्री पिचड यांनी माध्यमांना सांगितले. शिर्डी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना ३१ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. कोणत्याही राजकीय नेत्याशी चार हात करणारे, त्यांना नमायला लावणारे, प्रस्थापित व्यवस्थेच्या परिघाबाहेर असूनही जिल्ह्य़ातील सर्व सत्तास्थानावर अंकुश ठेवून असणारे पिचड हे भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशासाठी हतबल का झाले. याबद्दल नगर जिल्ह्य़ाच्या राजकारणात तर्क-वितर्क केले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी पक्की तर होतीच पण विजयी व्हायलाही अडचण नव्हती. असे असतानाही त्यांना पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागला. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना आयुष्यभर राजकीय विरोध केला, पण अखेर पुत्रप्रेमापोटी विखे यांचे सुपुत्र गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याच आधाराने राजकीय निर्णय करण्याची वेळ एका दिग्गज नेत्यावर आली. डाव्या विचाराशी जवळीक असली तरी काँग्रेसचा विचार पिचड यांनी स्वीकारला. १९८० मध्ये ते काँग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जिल्ह्य़ातील नेत्यांनी त्यांच्या स्थानिक विरोधकांना रसद पुरविली, पण काही उपयोग झाला नाही. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केले. पुढे २०१४ची विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेऊन चिरंजीव वैभव यांना विधानसभेला उभे करून निवडून आणले.  माजी मंत्री पिचड हे तसे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या गटाचे. पण पुढे त्यांनी पवारांचे नेतृत्व स्वीकारले. पवारांनीही त्यांना राजकारणात भरभरून दिले. सर्व पक्षांतील आदिवासी आमदार त्यांचे नेतृत्व मानतात. धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण देण्यास पिचड यांनी विरोध केला. धनगर आरक्षणाचा निर्णय घेता न आल्यामुळे अजित पवार हे पिचड यांच्यावर नाराज होते. विधानसभेच्या काही जागा त्यामुळे गेल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण अजित पवारांनाही पिचड यांनी भीक घातली नाही. आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये अकोले तालुक्यात पिचड यांचाच प्रभाव राहिला. आजही तो टिकून आहे. आमदार वैभव पिचड यांनीही मतदारसंघाची बांधणी केली आहे. सर्वच अनुकूल बाबी असताना पिचड पिता-पुत्रांना भाजप प्रवेशाचा निर्णय करावा लागल्याने जिल्ह्य़ात तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

पिचड पिता-पुत्रांच्या व्यक्तिगत अडचणींमुळे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे राजकीय अथवा विकासाचे कारण नाही. पिचड हे जरी विकासाकरिता भाजप प्रवेश केल्याचे सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाकामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट सोडविण्यासाठी मध्यस्थी केली.

– अशोक भांगरे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद,

नगर पुढील पिढीचे भवितव्य, तालुक्याचा विकास आणि आदिवासी समाजाचे प्रश्न कोण सोडवू शकेल, हा विचार करूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

– मधुकरराव पिचड, माजी मंत्री