News Flash

वाई न्यायालयाकडून उदयनराजेंची निर्दोष सुटका

आनेवाडी टोल नाका हस्तांतर आंदोलन प्रकरणी निकाल

विश्वास पवार
आनेवाडी (ता. वाई) टोलनाका येथील टोल हस्तांतर आंदोलन प्रकरणी उदयनराजे व इतर ११ समर्थकांची वाई न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी सहा वाजता आनेवाडी टोल नाका येथे खासदार उदयनराजे यांच्यासह अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले, सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते.

आनेवाडी टोल नाका येथे २५० जणांचा बेकायदेशीर जमाव जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा तसंच टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे सांगत टोल हस्तांतरणास विरोध केला होता. यावेळी टोलनाक्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या सर्व घटनेमुळे टोलनाका परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत भुईज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी वाई येथील न्या एम एन गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली.

सुनावणीदरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम सुनावणीनंतर उदयनराजे व त्यांच्या ११ सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी न्यायालयात खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने वकील ताहेर मनेर यांनी काम पाहिले. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 1:50 pm

Web Title: bjp udyanraje bhosale anewadi toll naka wai court sgy 87
Next Stories
1 अखेर ‘संभाजी बिडी’चं नाव बदललं, आता ‘या’ नावाने होणार विक्री
2 जयंत पाटलांच्या ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं’वर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल – शरद पवार यांचा टोला
Just Now!
X