पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो,” असं यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. “फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का ? असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी विचारला. सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली. शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेना भवनचा फोटो दाखवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या फोटोंच्या जागेवरुन टीका केली. यापुढे तोंडातून ब्र काढला तर ऐकून घेणार नाही. यांनी काहीही टीका करायची आणि उदयनराजेंनी ऐकून घ्यायची असं चालणार नाही अशी तंबीच यावेळी उदयनराजेंनी दिली.

“गेल्या जन्मात सर्वांपेक्षा मुंगीएवढं जास्त पुण्य केलं म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. आपण कधीही महाराजांचे वंशज म्हणून कधीही दुरुपयोग केला नाही. कधीही मिरवलो नाही. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखं धावलो नाही,” असं सागत उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं. नाव बदलल्यानंतर राज्यातील किती तरुण तुमच्यासोबत राहतात हे मला पहायचं आहे असं आव्हान यावेळी उदयनराजेंनी दिलं.

“स्वार्थासाठी एकत्र येणारे जास्त काळ एकत्र राहत नाही. स्वार्थ साध्य झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात. महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा. जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना तोडणं कठीण असतं,” अशी टीका यावेळी उदयनराजे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.