25 February 2021

News Flash

“…तर तिथेच राजीनामा दिला असता”, व्यंकय्या नायडूंनी समज दिल्यानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

व्यंकय्या नायडूंच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

राज्यात सध्या भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी समज दिली असं म्हटलं. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन केलं आहे. उदयनराजे दिल्लीमधील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यसभेत झालेल्या प्रकारावर बोलताना उदयनराजे यांनी सांगितलं की, “व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं”. पुढे ते म्हणाले की, “अनेकांनी वाद सुरु केला आहे. माझी त्या सर्वांना वाद थांबवा अशी हात जोडून विनंती आहे. महाराजांच्या नावे आतापर्यंत भरपूर राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता”.

“जे घडलंच नाही त्यावरुन राजकारण सुरु आहे. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना माहिती आहे. हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याऐवजी आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस खासदाराला विचारायला हवा. शरद पवार तिथेच बसले होते त्यांना विचारा,” असं उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी ते एक महान व्यक्ती असल्याचा टोला लगावला. आपल्याकडे महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागणारे असं म्हणत आहे हे आश्चर्यचकित करणारं आहे असंही ते म्हणाले आहेत.

“मी कधीही कोणाची बाजू घेत नाही. जर व्यंकय्या नायडू चुकले असते तर तिथेच बोललो असतो. सभापती या नात्याने घटनेला धरुनच ते बोलले. चुकीचं बोलले असते तर मीच त्यांना माफी मागण्यास सांगितलं असतं,” असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेवर टीका –
“शिवसेना महाराजांच्या नावावर आधारित पक्ष आहे. बाळासाहेबांबद्दल आदर आहे. पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब ठाकरे मोठे हे त्यांनी सांगावं. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वरती आणि महाराजांचा फोटो खाली आहे. यावर कोणीही आक्षेप का घेतला नाही? जर बाळासाहेब ठाकरे मोठे असतील तर नाव बदलून ठाकरे सेना करावं,” असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

काय झालं होतं ?
उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती नायडू यांनी त्यांना समज दिली होती. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, “हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशी नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 1:08 pm

Web Title: bjp udyanraje bhosale on jai bhavani jai shivaji rajya sabha venkaiah naidu sgy 87
Next Stories
1 बीड : वरिष्ठ अधिकाऱ्याने अंगणवाडी सेविकांच्या ग्रुपवर टाकला स्वतःचा नग्न फोटो
2 “संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अद्याप घोषणा नाही”; संजय राऊत यांचा टोला
3 अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप; MPSC च्या तीन पदांवरती निवड
Just Now!
X