04 March 2021

News Flash

राष्ट्रवादीऐवजी सेना पोखरण्याचे भाजपाचे डावपेच

शिवसेनेला पोखरण्याचे डावपेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवले आहेत.

भाजप-सेना युतीचा रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा मुख्य विरोधक असला तरी त्या पक्षाला लक्ष्य करण्याऐवजी राज्याच्या व जिल्ह्याच्या सत्तेमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला पोखरण्याचे डावपेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवले आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेतही भाजप-सेना युतीची सत्ता असली तरी गेल्या सुमारे दोन वर्षांपासून या युतीमध्ये अंतर पडत चालले आहे. या दोन्ही ठिकाणी पदांचे वाटप असो किंवा महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते व पदाधिकारी परस्परांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. तसेच त्यावरून एकमेकांवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जातात. नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबरात, तर जिल्हा परिषदेची पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर हे प्रकार आणखीच वाढले असून एखाद्या तालुक्यातील शिक्षिकेच्या बदलीचासुद्धा विषय सेनेच्या आमदारांच्या पातळीवरून प्रतिष्ठेचा केला जात आहे आणि त्याला दुसऱ्या पक्षाकडून थेट शिक्षणमंत्र्यांचा आदेश आणत प्रत्युत्तर दिले जात आहे.

अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी वातावरण गढूळ होत चालले असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी देवरुख येथे नुकत्याच झालेल्या सेना कार्यकर्त्यांच्या भाजपप्रवेश कार्यक्रमामध्ये, आता अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत पक्षाचे भावी राजकीय धोरणच स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रवेश केलेले हे कार्यकर्ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या घरचे मैदान असलेल्या संगमेश्वर तालुक्याच्या कसबा जिल्हा परिषद गटातील असल्यामुळे या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे. तसेच थेट जिल्हाप्रमुखांच्याच गोटात फूट घडवण्याचे डावपेच भाजपने यशस्वी केले आहेत. सेनेचे जिल्हा प्रमुख महाडिक आणि त्यांच्या पत्नी रचना महाडिक या गटाचे प्रतिनिधित्व गेली सुमारे वीस वष्रे करत आहेत. रचना महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही उपभोगले आहे. देवरुख नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या काळात भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष आणि तत्कालीन उमेदवार नीलेश भुरावणे व अन्य चार कार्यकर्त्यांच्या अपहरण प्रकरणामध्ये महाडिक सहआरोपी आहेत, हेही या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुखांवर घराणेशाहीचा आरोप करून काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षत्याग केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सेनेच्या जिल्हा प्रमुखांना त्यांच्या घरच्या मैदानातच आव्हान उभे करण्याचे भाजपचे डावपेच यातून उघड झाले आहेत.  या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशप्रसंगी बोलताना माने यांनी, गेली २५ वष्रे युतीचा संसार इमानाने करूनही आमच्या वाटय़ाला अवहेलनाच आली, असे सांगत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे दिलेले संकेत त्या दृष्टीने नोंद घेण्यासारखे आहेत.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील फणसोप व नाचणे या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेच्याच सदस्यांनी पक्षादेश धुडकावून लावत बंडखोरी केली होती. मात्र संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे आदेशावर चालणारा पक्ष, ही असलेली सेनेची प्रतिमा जिल्ह्यात मलीन झाली आहे. याही प्रकारांचा फायदा उठवत सेनेला पोखरण्याचे डावपेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवले आहेत. दरम्यान पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून सेनेतून निलंबित करण्यात आलेल्या चार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह मोठय़ा संख्येने या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:17 am

Web Title: bjp vs shiv sena
Next Stories
1 निम्न पेढी प्रकल्पाचा खर्च १२ वर्षांत सहापट!
2 गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’
3 कोपर्डीप्रकरणाच्या निषेधार्थ उस्मानाबादमध्ये मराठा समाजाचा मूकमोर्चा
Just Now!
X