शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम सुरु केली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याची माहिती आहे. ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. या मुद्द्यावरून राजकारणाला जोर आला असून महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने घेतलं ताब्यात

प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे ही कारवाई केली जात आहे असं वाटतंय का? असा प्रश्न भुजबळ यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “प्रताप सरकानाइक हे अतिशय चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. पण असे विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे (Focused) नेते कदाचित काहींच्या डोळ्यात खुपताना दिसत आहेत, म्हणून हा राजकीय सूडाचा प्रकार घडतोय. ईडी हे केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याचं दिसतंय. पण कोणतंही आणि कितीही दडपण आणलं गेलं तरीही एक लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष आणि त्यापुढेही सुरळीत चालणार!”

आणखी वाचा- “सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु,” प्रताप सरनाईकांविरोधातील कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सोमवारी निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या सभेत काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार येईल अशा आशयाचं वक्तव्य केलं. त्याचाच भाग म्हणून ‘ईडी’च्या धाडी टाकून दबाव टाकला जातोय असं वाटतंय का? असा सवालही भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर, “राज्यातील सरकार भक्कम आहे. पण भाजपाला राज्यात पुन्हा एकजा त्यांचे सरकार राज्यात प्रस्थापित करण्याची फारच ओढ लागली आहे. त्यामुळे अशाप्रकारचे पक्ष सर्व प्रकाराने दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात”, अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.