पनवेलचा अपवाद वगळता कोकणात भाजपची पाटी कोरी आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढाव्या लागणार हे लक्षात घेऊन भाजपने रायगड जिल्ह्य़ात आपली ताकद वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. त्यातूनच शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. रायगड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्य़ाच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामांची जंत्री सादर करून जिल्ह्य़ात पक्षाला ताकद मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

स्वबळावर निवडणुकीची घोषणा केलेल्या शिवसेनेला रायगड जिल्ह्य़ात मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासह शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. साटम यांच्या भाजप प्रवेशामुळे सेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर भाजपला रायगडात आपल्या कक्षा रुंदवण्याची संधी या निमित्ताने चालून आली आहे.

कर्जत-खालापूर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र अंतर्गत गटबाजी आणि पाडापाडीच्या राजकारणात मतदारसंघात सेनेची वाताहत होत गेली. त्यामुळे जुनेजाणते कार्यकर्ते आता पक्षाला सोडून जाऊ  लागले आहेत. यात आता माजी आमदार देवेंद्र साटम यांची भर पडली आहे. शिवसेनेकडून तीन वेळा कर्जत-खालापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे साटम अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणुकीची भाषा करणाऱ्या शिवसेनेला रायगड जिल्ह्य़ात मोठा धक्का बसणार आहे.

पक्षांतर्गत गटबाजीमुळे कर्जत-खालापूर मतदारसंघात शिवसेनेला दोनदा पराभवाला सामोर जावे लागले आहे. दोन्ही वेळेस शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे. राष्ट्रवादीचे सुरेश लाड मतदारसंघातून निवडून आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही वेळा ज्यांनी सेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली, त्यांना निवडणूक निकालानंतर पक्षसंघटनेत पुन्हा स्थान देण्यात आले. यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी कोंडी होत गेली आणि सेनेच्या बालेकिल्लय़ात एक एक बुरुज ढासळत गेले.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सेनेने पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेपासून साटम यांना दूर ठेवण्याचे धोरण स्वीकारले. तर दुसरीकडे पक्षाला आव्हान देणाऱ्यांच्या हातात पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवली यामुळे व्यथित होऊन साटम यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतदारसंघात सेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या प्रभावामुळे आजवर कोकणात भाजपला आपले स्थान निर्माण करता आलेले नाही. पनवेल आणि उरणचा शहरी भाग सोडला तर रायगड जिल्ह्य़ात भाजपचे अस्तित्व फारसे नाही. अशा वेळी साटम यांच्यासारखा प्रस्थापित नेता पक्षात येणे ही भाजपसाठी जमेची बाजू असणार आहे. मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून साटम यांचा विचार करणे शक्य होणार आहे. या निमित्ताने सेनेची कोंडी करण्याची एक आयती संधीही भाजपला मिळणार आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघापाठोपाठ, उरण आणि पनवेल तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ जिंकत भाजपने रायगडात आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केली होती. यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये उरण नगरपालिका स्वबळावर जिंकत सेनेला धक्का दिला होता. पहिल्यांदाच झालेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत एकहाथी सत्ता मिळवत भाजपने मतदारसंघातील आपली पकड मजबूत झाल्याचे दाखवून दिले. मात्र पनवेल आणि उरण तालुके सोडले तर भाजपला जिल्ह्य़ात इतर कुठेही मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, उरणमध्ये महेश बालदी यांच्या रूपाने प्रस्थापित नेते भाजपला मिळाले होते. पण इतर मतदारसंघांत अशा प्रस्थापित नेतृत्वाची भाजपला गरज होती. देवेंद्र साटम यांच्या रूपाने कर्जत-खालापूर मतदारसंघात भाजपची ही कमतरता भरून निघणार आहे.

देवेंद्र साटम यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघात शिवसेनेची मते मोठय़ा प्रमाणात फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात सेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी सेनेच्या या मतविभाजनाचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होणार आहे.

कर्जतनंतर पेण?

पेण मतदारसंघातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रविशेठ पाटील सध्या नाराज आहेत. पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेत डावलले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. जिल्ह्य़ात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी होऊ  नये अशी त्यांची भूमिका आहे. मात्र राज्यपातळीवर तीनही पक्षांना एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच नाराज असलेले रविशेठ पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची नाराजी दूर झाली नाही तर भाजपला जिल्ह्य़ात आणखी एक प्रस्तापित नेतृत्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनाप्रमुखांच्या वेळची शिवसेना व आत्ताची उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जमान्यात शिवसेना-भाजपा युती तुटली नव्हती. आता व्यासपीठावर चार पक्षांमधून आलेल्या गद्दारांचा भरणा असतो. मी शिवसेनेसाठी लाठय़ाकाठय़ा खाल्या. माझ्यावर खटले झाले. प्रसंगी जेलमध्ये गेलो. सेना वाढविली. दोन्ही तालुक्यांत शिवसेनेचे वर्चस्व ठेवले, तरीही मला आठ र्वष बाजूला ठेवले. ही कुचंबणा लक्षात घेऊन सेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र साटम, माजी आमदार