लोकसभेच्या निकालात राज्यात भाजपला काँग्रेसपेक्षा दोन-चार जागा जास्त मिळतील, असा अंदाज केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केला. तसेच सत्तास्थापनेसाठी मोदींनी मदत मागितली तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकींच्या निकालाविषयी पवार बोलत होते. ते म्हणाले, की निकालासंदर्भात मत व्यक्त करण्यासाठी आपण ज्योतिषी नाही, त्यामुळे आपणही १६ तारखेची वाट पाहात आहे. पण केंद्रात सरकार स्थापन करताना एनडीए, यूपीए यांची संख्या विचारात घेताना, निधर्मी पक्षांचे प्रतिनिधी किती आहेत आणि त्यांनी काँग्रेस आघाडीला मदत केली तर सरकार काँग्रेसचे स्थापन होऊ शकते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे.
 मोदींची लाट जाणवली नसल्याचे सांगत ते म्हणाले, की लाट म्हणता येईल अशी एकच निवडणूक देशाच्या इतिहासात झाली ती म्हणजे १९७७ ची. आणीबाणीची किनार त्याला होती. लोकांचा उठाव होता. त्या वेळी काँग्रेसविरोधी लाट दिसली, मात्र आज जी मोदी लाट दिसते आहे ती माध्यमांनी निर्माण केलेली लाट आहे. आपल्या शिरावर एखाद्या उमेदवाराची जबाबदारी आहे, असे यापूर्वी माध्यमे कधीही वागली नव्हती, मात्र या निवडणुकीत ते दिसले. तसेच देशात आत्तापर्यंत झालेल्या मतदानात सर्वत्र वाढ झाली. पश्चिम बंगालमध्ये ८० टक्क्यांवर मतदान झाले, ही लोकशाहीच्या दृष्टीने चांगली बाब आहे, असे पवार म्हणाले, मात्र याचा लाभ कोणाला होणार याचे उत्तर त्यांनी टाळले.