अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणारा हा एक जुमला होता हे भाजपाने फक्त जाहीर करावे. लोकसभेत ते २८० वरुन दोन जागांवर आल्याशिवाय रहाणार नाहीत असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. रायगड जिल्ह्यात महाड येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भाजपाने ज्या विटा गोळा केल्या. त्या विटा मंदिरासाठी नव्हत्या तर त्या भाजपाला सत्तेकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या होत्या अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.

शिवसेना आणि भाजपा केंद्र आणि राज्यातील सत्तेत एकत्र आहेत पण दोन्ही पक्ष सातत्याने परस्परांवर टीका करत असतात. सामनाच्या अग्रलेखातून दररोज मोदी सरकारवर बोचरी टीका केली जाते. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता लढाई सुरु झाली आहे. सध्या राजकारण आणि देशातील वातावरण निराशाजनक असल्याचे ते म्हणाले.

२०१९ च्या निवडणुका जवळ येत आहेत. राजकीय पक्षांबरोबर काय होणार याची मला चिंता नाही. पण देशातील लोकांचे काय होणार त्याची मला चिंता लागून राहिली आहे असे ठाकरे म्हणाले. २०१४ साली भाजपाचे सरकार बहुमत्ताने सत्तेवर आले पण महागाई कमी झाली नाही आणि रोजगारही वाढला नाही असे ठाकरे म्हणाले.