खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी ओरस पडवे येथे आले होते. या उद्घाटन प्रसंगी शाह यांनी दिलेल्या भाषणामध्ये राजकीय टोलेबाजी करण्याबरोबरच राणे यांचं कौतुकही केलं. अमित शाह यांनी राणेंचं कौतुक केल्याचा व्हिडीओ नितेश राणे यांनी ट्विटवरुन पोस्ट करताना अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्यात. नितेश यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शाह यांनी पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तराचाही उल्लेख आहे.

अनेक जण नारायण राणे यांच्या नेतृत्वासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मी नारायण राणे यांच्याकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये जेथे जेथे अन्याय होतो तेथे ठामपणे भूमिका घेणारा आणि स्पष्टपणे बोलणारा नेता दिसतो, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं. पुढे बोलताना त्यांनी, सार्वजनिक आयुष्यामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं कारण जी व्यक्ती स्वत:विरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात लढू शकत नाही ती जनतेविरुद्धच्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाही असं म्हटलं. जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं त्यांना वाटलं त्यांनी भविष्याचा जास्त विचार न करता त्या अन्यायाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळेच राणेंच्या राजकीय प्रवासामध्ये फार वळणं असल्याचं दिसून येतं , असं अणित शाह म्हणाले.

आणखी वाचा- भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नाही; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचं टीकास्त्र

नारायण राणेंवर तुमच्या पक्षाकडूनही अन्याय झाला तर काय करणार?, असा प्रश्न मला काही पत्रकारांनी विचारल्याचंही शाह यांनी या भाषणात म्हटलं. या प्रश्नाला उत्तर देताना, “मी त्यांना राणेंवर भाजपामध्ये अन्याय होणार नाही,” असं सांगितल्याचंही शाह यांनी नमूद केलं. भारतीय जनता पार्टीला नारायण राणेंसारख्या नेत्याला कशाप्रकारचा सन्मान द्यायचा आणि त्यांचा मान कसा राखायचा हे ठाऊक आहे असंही शाह यांनी यावेळी सांगितलं. भाजपा नारायण राणेंवर अन्याय करणार नाही. राणेंचा निश्चित सन्मान पक्षाकडून केला जाईल. तसेच कसा सन्मान करायचा याचा निर्णय पक्ष घेईल, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

याच भाषणामध्ये शाह यांनी आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं याचा पुन्हा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींच्या नावाने उद्धव ठाकरेंनी मत मागितली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी तिलांजली दिली. या तीन चाकी सरकारची तीन दिशांना तोंडे आहेत, असा टोला शाह यांनी लगावला.