News Flash

महाराष्ट्रासाठी भाजपा ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणार – दरेकर

राज्याला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा नेते दमणला; फडणवीसांनी औषध उत्पादक कंपन्यांशी केली चर्चा

राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजपा नेत्यांनी आज (सोमवार)दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. करोना रुग्णांची हेळसांड सुरू असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचेही दिसून येत आहे. तर, राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीशी चर्चा करण्यासाठी आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली.

ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसिवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दमण येथून दिली आहे.

करोना काळात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता भयभीत झाली आहे. राज्य सरकारने आरोप, प्रत्यारोपाचा खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर आज ही वेळ आली नसती, असा आरोप करून महाराष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्य भावनेतून भाजपा करोना रुग्णांची मदत करीत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!; ‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली

तसेच, ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीने दिलेल्या रेमडेसिवीरमुळे देखील रुग्णांची मोठ्या प्रमाणावरील असलेली मागणी पूर्ण करता येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला आहे. दमणच्या या भेटीत त्यांच्या समवेत भाजप आमदार प्रसाद लाड आणि दमणचे खासदार लालु पटेल व इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवण्याच्या केंद्राच्या निर्णयावर आरोग्यमंत्री टोपेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी करोना लसींची जितकी गरज असेल, तितक्या प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 5:19 pm

Web Title: bjp will provide 50000 remdesivir injection for maharashtra darekar msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गुढीपाडव्याला स्वागतयात्रा मिरवणूक, बाईक रॅली काढण्यास बंदी; ठाकरे सरकारकडून नियमावली
2 …नाहीतर सरकारने तत्काळ रोहित पवारांवर कारवाई करावी -निलेश राणे
3 पंढरपूर : “सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा”, मंगळवेढ्यात प्रचारादरम्यान फडणवीसांचं विधान!
Just Now!
X