लातूर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांचा तब्बल २ लाख ५३ हजार ३९५ अशा विक्रमी मतांनी पराभव करून मराठवाडय़ात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा बहुमान पटकावला.
मागील निवडणुकीत गायकवाड ७ हजार १९५ मतांनी पराभूत झाले होते. त्या वेळी ५५ टक्के मतदान झाले होते. या पराभवाचा वचपा काढताना त्यांनी विजयावर मोहोर उमटविली. महाराष्ट्राच्या तुलनेत काँग्रेसने लातुरात सर्वाधिक नियोजनबद्ध प्रचार केल्याचा दावा केला होता, तर भाजपचा प्रचार अतिशय ढिसाळ होता. परंतु नरेंद्र मोदींच्या एका सभेने सगळा नूर पालटला व राहुल गांधींची सभा होऊनही काँग्रेसला शेवटपर्यंत चाचपडण्याची वेळ आली. विलासराव देशमुख यांच्या सहानुभूतीची लाटही विरून गेली.
गायकवाड यांना सहाही विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली. टपाल मतांमध्येही त्यांनी आघाडी घेतली. गायकवाड यांना ६ लाख १६ हजार ५०९, तर बनसोडे यांना ३ लाख ६३ हजार ११४ मते मिळाली. बसपचे दीपक कांबळे २० हजार २९, तर आपचे दीपरत्न निलंगेकर यांना ९ हजार ८३९ मते मिळाली. गायकवाड पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत आघाडीवर होते. निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर गायकवाड यांचा भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला. टपालातील ३ हजार ४६ पकी २ हजार ६०९ मते वैध ठरली. यात गायकवाड यांना १ हजार ९५२, तर बनसोडे यांना ५९० मते मिळाली.
विजय जनतेला समर्पित – गायकवाड
डॉ. गायकवाड यांनी हा विजय पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचा आहे. लातूरच्या जनतेने आपल्यावर प्रेम केले व विक्रमी मतांनी विजयी केले, त्याबद्दल हा विजय मतदारसंघातील जनतेला समíपत करीत असल्याची, तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी लातूरकरांचा कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
जालन्यात चौथ्यांदा दानवे
जालना – जालना मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे सलग चौथ्यांदा निवडून आले. मोदी लाटेत दानवेंचा विजय अनपेक्षित नसला, तरी दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याची त्यांनाही अपेक्षा नव्हती. उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा एक लाख मताधिक्याने विजयी होऊ, असे त्यांनी म्हटले होते.
दानवे यांना ५ लाख ९१ हजार ४४८, तर औताडे यांना ३ लाख ८४ हजार ६३० मते मिळाली. २ लाख ६ हजार ८१८ मतांच्या फरकाने दानवेंनी बाजी मारली. दानवे यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे नवखेच होते. मतदारसंघातील सहापैकी पाच उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे असले, तरी त्यांचा उपयोग औताडे यांना झालाच नाही. औताडे यांच्यासाठी राहुल गांधी यांची मोठी सभाही झाली होती. औताडे यांच्या प्रचाराची गती चांगली होती. परंतु आघाडीतील गटा-तटांत ते बऱ्यापैकी अनभिज्ञ होते. आघाडीतील परस्परविरोधी पुढारी, कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून भाजपविरुद्ध उभे करण्यात ते कमी पडले. स्वपक्षातील हट्टाग्रही पुढाऱ्यांची मने सांभाळताना औताडे व समर्थकांची दमछाक झाली.
आपला विजय निश्चित होता. यूपीए सरकारमधील कारभारास वैतागलेल्या जनतेने भाजपसह नरेंद्र मोदींवरील विश्वास मतदानातून व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.