जिल्हय़ातील नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली. एकूण सातपैकी तीन ठिकाणी पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झाले, तर एका ठिकाणी पक्षाच्या बंडखोर उमेदवाराने बाजी मारली. तीन नगरपालिकांमध्ये त्यांना बहुमतही मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली असून, राष्ट्रवादीसमोर  अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे, तर शिवसेनाही या निवडणुकीत प्रभावहीन ठरली.  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा साईबाबा देवस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे या काँग्रेसच्या नेत्यांसह भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला.

कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, देवळालीप्रवरा व पाथर्डी अशा सात नगरपालिका व शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीने जिल्हा ढवळून काढला होता. ममता पिपाडा (राहाता), मृत्युंजय गर्जे (पाथर्डी), सत्यजित कदम (देवळालीप्रवरा) या तीन ठिकाणचे नगराध्यक्षपद भाजपने जिंकले, तर कोपरगाव येथे त्यांचेच बंडखोर विजय वहाडणे (मोदी विचार मंच- अपक्ष) यांनी  विजय मिळवत येथील काळे-कोल्हे अशा पारंपरिक राजकारणाला छेद दिला. दुर्गाताई तांबे (काँग्रेस), प्राजक्त तनपुरे (राहुरी, शिवसेना- अपक्ष), अनुराधा आदिक (श्रीरामपूर, राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना महाआघाडी) हे नगराध्यक्षपदी विजयी झाले.

[jwplayer sOhKTsfm]

नोटाबंदी व अन्य कारणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव लोकांवर आहे, हे या निवडणुकीतही पुन्हा स्पष्ट झाले. श्रीरामपूर, कोपरगाव व राहाता येथील निकाल जिल्हय़ात धक्कादायक ठरले. श्रीरामपूर नगरपालिकेत जयंत ससाणे यांचे गेले २८ वर्षे एकहाती वर्चस्व होते. मात्र त्यांच्या पत्नी व मावळत्या नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांना येथे मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागला. ३२ सदस्यांच्या नगरपालिकेत २२ जागा जिंकून त्यांनी बहुमत मिळवले असले तरी नगराध्यक्षपद गेल्याने त्यांच्या सत्तेला ग्रहण लागले आहे. कोपरगाव येथील निकाल जिल्हय़ात धक्कादायक ठरला आहे. गेली ५० वर्षे काळे-कोल्हे यांच्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाला भाजपचे बंडखोर विजय वहाडणे यांनी छेद दिला.  ८ हजार मतांनी ते नगराध्यक्षपदी विजयी झाले. पालिकेत बहुमत मात्र भाजप-शिवसेना युतीचे झाले आहे.

विखे यांच्या राहाता नगरपालिकेचा निकालही त्यांना धक्का देणाराच ठरला. माजी नगराध्यक्ष ममता पिपाडा (भाजप) यांनी काँग्रेसचा पराभव करून विखे यांच्यासमोर भविष्यातील आव्हान उभे केले आहे. विखे यांना देवळालीप्रवरा व राहुरीतही पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. देवळालीप्रवरात भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी बाजी मारली. त्यांचे चिरंजीव सत्यजित कदम हे नगरसेवकांच्या बहुमतासह विजयी झाले. राहुरीत विखे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे एकत्र येऊनही माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे नगरसेवकांच्या बहुमतासह विजयी झाले. पाथर्डीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे व जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर या दोघांच्या आघाडीचा पराभव केला.

काँग्रेसला धक्का

श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, देवळालीप्रवरा या नगरपालिका व शिर्डी नगरपंचायतीत सत्तांतर झाले. त्यातही श्रीरामपूर व कोपरगाव महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर बहुमत दुसऱ्या पक्षाचे झाले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण यांच्या मतदारसंघातील राहाता व त्यांनी विशेष लक्ष घातलेल्या देवळालीप्रवरा या नगरपालिकेत व पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचे दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसला नगराध्यक्षपद गमवावे लागले. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. विशेषत: विखे यांना स्वत:च्या राहाता व त्यांनी लक्ष घातलेल्या राहुरी व देवळालीप्रवरा नगरपालिकेतील पराभव हा चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय कोपरगाव, देवळालीप्रवरा व पाथर्डी अशा तीन नगरपालिकांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसची पारंपरिक मते त्यांच्यापासून दूर गेल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र संगमनेर नगरपालिकेतील सत्ता एकहाती अबाधित ठेवून काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले. त्यांनी नगराध्यक्षपदासह बहुमत मिळवले. काँग्रेसला संगमनेर व विखेंच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायत हाच दिलासा आहे.

[jwplayer sQMhdLTa]