भाजप आणि काँग्रेसचे समसमान नगराध्यक्ष; राष्ट्रवादीला धक्का
मुंबई : पाच नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य तर नगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. रायगडमधील कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसला.
पाच नगरपालिकांच्या एकूण ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३९ उमेदवार निवडून आले. काँग्रेस (३०), राष्ट्रवादी काँग्रेस (१०) तर शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. पाचपैकी भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक नगराध्यक्ष निवडून आला.
कर्जत नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा
रायगड जिल्ह्य़ातील कर्जत नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फाजील आत्मविश्वास नडला आहे. शेकाप आणि काँग्रेसला आघाडीत स्थान न दिल्याने नगरपरिषदेवरची सत्ता गमावण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतिक्षा लाड यांचा २,६९४ मतांनी पराभव केला. यामुळे मुलीला राजकारणात पुढे आणण्याचा आमदार सुरेश लाड यांचा प्रयत्न फसला. शिवसेनेचे चार व भाजपचे प्रत्येकी चार तर रिपाइंचे दोन असे युतीचे एकूण १० नगरसेवक निवडून आले, तर राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले. सातारा जिल्ह्य़ातील कराडनजिक मलकापूर नगरपालिकेत काँग्रेसने बहुमतासह नगराध्यक्षपद जिंकले. माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ आहे. येथे काँग्रेसचे वर्चस्व होते.
विदर्भात भाजपची बाजी
विदर्भात नागपूर जिल्ह्य़ातील महादुला नगरपंचायत आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने यश संपादन केले. अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या (जि. गोंदिया) एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेने भाजपवर मात केली. नागपूर जिल्ह्य़ातील महादुला हे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव आहे. येथील नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. ती कायम ठेवण्यात बावनकुळे यांना यश आले. नगराध्यक्ष आणि सर्वाधिक सदस्य भाजपचे निवडून आले. १७ जागांपैकी ११ जागा भाजपला मिळाल्या. गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. नगराध्यक्षपद आणि १७ पैकी आठ जागा भाजपने जिंकल्या. कॉंग्रेसला सहा, भाकप, शिवसेना व अपक्षाला एक जागा मिळाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 12:57 am