18 February 2020

News Flash

भाजपचे काम कमी मार्केटिंग जास्त ; आमदार रोहित पवार यांची टीका

भाजपकडून ज्या पद्धतीने या योजना राबवल्या गेल्या पाहिजे होत्या, तशी त्यांची अंमलबजावणी झाली नाही

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या कारभारावर आणि योजनांवर टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार या योजनांवर काम केले, मात्र या सर्व योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत. भाजपने काम कमी केले आणि कामांचे मार्केटिंगच जास्त केले, अशी टीका रोहित पवार यांनी केली. अमरावती येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.

भाजपकडून ज्या पद्धतीने या योजना राबवल्या गेल्या पाहिजे होत्या, तशी त्यांची अंमलबजावणी झाली नाही. मागेल त्याला शेततळे या योजनेत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तेवढय़ा पैशात काहींची शेततळी तयारही झाली नाहीत. शेततळे तयार करण्यासाठी पाणी टाकायला प्लास्टिक कागद लागते. फक्त आकडे वाढवण्यासाठी शेततळी देण्यात आली. अनेकांना अस्थरीकरण मिळालेही नाही. पण त्या शेततळ्यात पाणी टाकल्यावर त्यामध्ये पाणी राहत नव्हते, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

जलयुक्त शिवारावर सहा ते सात हजार कोटींपर्यंत खर्च मागील सरकारने केला. मात्र या योजनांमध्ये केलेल्या कामाची आजची स्थिती वाईट आहे. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. या योजनांमागे विचार चांगला होता, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये असताना इंटिग्रेटेट वॉटर शेड योजना राबवण्यात आली होती, ती बदलून भाजप सरकारने नवी योजना सुरू केली. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही म्हणून लोकांना त्याचा फायदा झाला नाही, असे रोहित पवार म्हणाले.

सरकारने सुरू केलेल्या स्कील इंडिया योजनेचे सेंटर आज बंद दिसतील. तरुणांसाठी नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र कुणालाही ते मिळाले नाही. गेल्या सरकारमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण कमी झाले. भाजप सरकारने कामाच्या मार्केटिंगवर जास्त   लक्ष   दिले . कामांबद्दल प्रश्न  विचारला की वेगळी उत्तर देऊन   लोकांची दिशाभूल केली. पाच  वर्षांत देखावा जास्त केला. मात्र आता या योजना लोकांना विश्वासात    घेऊन लोकांपर्यंत कशा पोहचतील यावर आमचे सरकार भर देईल, असे रोहित पवार म्हणाले.

First Published on January 28, 2020 3:35 am

Web Title: bjp work less do more marketing says mla rohit pawar zws 70
Next Stories
1 अश्लील चाळे करून बलात्काराचा प्रयत्न ; अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न
2 सांगलीतील ९३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ – जयंत पाटील
3 सैन्य भरतीच्या आमिषाने १२ तरुणांची फसवणूक
Just Now!
X