तीन आरोपींना अटक
यवतमाळ : आर्णी येथील भाजप कार्यकर्ता नीलेश हिम्मतराव मस्के (३२) यांच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. यामुळे आर्णी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये संजय देठे, मिलिंद देठे व गुलाब धकाते यांचा समावेश असून हे तिघेही आर्णी तालुक्यातील पहुर नस्करी येथील रहिवासी आहे.
गंभीर जखमी झालेल्या नीलेश मस्के यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. नीलेश मस्के आर्णी येथील बालाजी पार्कजवळ राहत होता. नीलेशचा मित्र ओम बुटले (रा. आर्णी) याने घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आर्णी येथे दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
शेतीच्या पैशाच्या वादातून खून झाल्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, ठाणेदार यशवंत बाविस्कर घटनेवर लक्ष ठेवून आहेत. शहरात सायंकाळपर्यंत विशेष पोलीस पथक धडकले असून शिवनेरी चौकातील दुकाने सायंकाळी बंद करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 1:16 am