पालघर लोकसभेची जागा राखण्यासाठी भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांकडे; शिवसेनेची पक्षबांधणी सुरू

पालघर : पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याचा दावा केला जात असला तरी याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे पालघरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. खासदार राजेंद्र गावित यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे पालघर लोकसभेच्या जागेसाठी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची आशा अजूनही कायम आहे. दुसरीकडे शिवसेनेने पालघरसाठी पक्षबांधणी आणि पुनर्रचनेसाठी जोमाने हालचाली सुरू आहेत.

शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान पालघर लोकसभेचा विषय पुढे येताच यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले होते. त्यामुळे पालघरबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेला २३ जागा देण्यात आल्या आहेत. यात सेनेसाठी पालघरसह हातकणंगलेची जागा सोडण्याचा विचार केला जात आहे. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. सेनेकडून खासगी संस्थामार्फत या दोन्ही जागेसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत असून त्याच्या वर पुढील निर्णय अवलंबून आहे असे सांगण्यात येते. तरीही पालघर जिल्ह्य़ात भाजपची ताकद टिकवून ठेवण्यासाठी ही जागा भाजपकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितल्याचे बोलले जात आहे.

नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे शिवसेनेचे आदेश

लोकसभेसाठी पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर शिवसेनेने पक्षबांधणीच्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका प्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलाविण्यात आले होते. जिल्ह्य़ात सेनेचे जे पदाधिकारी सक्रिय नाहीत, त्यांना बदलून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करा; तसेच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोईसर चारोटी आमदार रवींद्र फाटक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना कार्यकर्त्यांनी कामाला लागावे या दृष्टीने प्रोत्साहित करण्यात येत आहे.