दूध दरवाढ प्रश्नाचे भाजपाचे आंदोलन आपमतलबी आहे. त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. आम्ही राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहोत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी केली.

दूध दरासाठी भाजपाने आज राज्य शासनाला निवेदन देवून आंदोलनास सुरुवात केली. याचा संदर्भ घेऊन शेट्टी यांनी हे तर भाजपाचे आपमतलबी आंदोलन असल्याची टीका केली. राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी उपलब्ध असताना मोदी सरकारने १० हजार मेट्रिक टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. दुधाचा प्रश्न राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याने सुटणार असल्याने भाजपाने हिंमत असेल तर दूध भुकटीची आयात रोखून दाखवावी,’ असे आव्हान शेट्टी यांनी दिले. राज्यात भाजपा सरकारन असताना दुधाला प्रति लिटर ५ रूपये अनुदान देण्याचा निर्णय गुंडाळून ठेवला. दूध पावडर आयात करायची आणि दूध भुकटीसाठी अनुदान मागण्याचा दुटप्पीपणा भाजपाच करू शकते,असा टोला त्यांनी लगावला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत असल्याने, आताचे आंदोलन आणि आमदारकी याचा काहीच सबंध नाही, असे म्हणत त्यांनी आमदारकीसाठी सुरु असल्याच्या भाजपाच्या आरोपाचे खंडण केले.