हर्षद कशाळकर

विविध पक्षांतील प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेऊन रायगड जिल्ह्य़ात भाजपने सातही विधानसभा मतदारसंघांत आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपची वाढती महत्त्वाकांक्षा शिवसेनेसाठी येत्या विधानसभा निवडणुकीत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील मावळ आणि रायगड या दोन्ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्या. आता विधानसभा निवडणुकीत जागावाटपात भाजप-सेनेचा कस लागणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या कोकणातील तीन जिल्ह्य़ांत पनवेलचा अपवाद वगळता भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे पाच वर्षांत भाजपने या पट्टय़ात नियोजनबद्ध पद्धतीने विस्तारवादी धोरण राबविले आहे.

इतर पक्षांतील नेत्यांना घेऊन बांधणी

विविध पक्षांतील प्रस्थापित नेत्यांना जवळ करून पक्षाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला आहे. अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश मोहिते यांना घेऊन भाजपने संघटनात्मक बांधणी केली. पेणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रवीशेठ पाटील यांना पक्षात घेऊन आपली घडी बसविली. कर्जत- खालापूरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांना भाजपने पक्षात घेतले. महाडमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बिपिन म्हामूणकर हे पक्षात आले. श्रीवर्धनची जबाबदारी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक कृष्णा कोबनाक यांच्यावर सोपविण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा वापर करून पक्षाने नियोजनबद्ध पद्धतीने आपली संघटनात्मक बांधणी केली. पनवेल आणि उरण मतदारसंघ सोडले तर जिल्ह्य़ात भाजपची फारशी ताकद नव्हती. मात्र आज प्रत्येक मतदारसंघात किमान एका संभाव्य उमेदवाराचा चेहरा पक्षाने निर्माण केला आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत युती झालीच तर किमान सातपैकी तीन जागांवर भाजपकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्य़ातील सातपैकी चार विधानसभा मतदारसंघांत सेना-भाजप युतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली. यात पनवेल, उरण, महाड, पेण या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. श्रीवर्धन मतदारसंघ सोडला तर कर्जत आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघांतही युतीने लढत दिली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अपेक्षा उंचावल्या. त्यामुळे या निकालानंतर भाजपने आता शिवसेनेवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मेळावे घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरत आहे.

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांमध्ये शिवसेनेने स्वबळावर लढत चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे जिल्हा परिषदेत १५ सदस्य निवडून आले आहेत. माथेरान, मुरुड आणि कर्जत या तीन नगरपालिका त्यांनी जिंकल्या आहेत. पोलादपूर, तळा नगरपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत. महाड, पोलादपूर, माणगाव आणि श्रीवर्धन पंचायत समित्या त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल असा विश्वास सेना नेत्यांना वाटतो आहे.

जागावाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे उचित होणार नाही. ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. त्या जागा शिवसेनेने लढवणे अपेक्षित आहे. दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील.

– महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख, शिवसेना

गेल्या पाच वर्षांत पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे युतीच्या माध्यमातून आम्ही जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रही राहू.

– महेश मोहिते, अलिबाग मुरुड भाजप विधानसभा संघटक