करोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आले असल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने शुक्रवारी ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलन करण्यात आले.कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरातून तर प्रमुख नेत्यांनी शहरात शारीरिक अंतरपथ्याचे पालन करून काळ्या फिती आणि काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. भाजपच्या आंदोलनाला शिवसेनेनेही भगवे झेंडे फडकवित प्रत्युत्तर दिले. करोना योद्धय़ांना समर्थन देत भाजपचा निषेष केला.

शहरातील राजवाडे बँक चौकात खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आले. त्यात जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी हे सहभागी झाले. हातात काळे झेंडे, फलक घेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ.भामरे यांनी टाळेबंदीमुळे सर्वाचेच नुकसान होत असल्याचे सांगितले.  स्वस्तिक चौकात भाजप पेठ मंडल अध्यक्ष राहुल तारगे, चंद्रकांत गुजराथी, ओम खंडेलवाल, रोहित चांदोडे यांनीही काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. धुळे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, पक्ष संघटक किशोर संघवी, जि.प. सदस्य आतिष पाटील यांनी पारोळा रोडवरील खासदारांच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविला.

भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनाही सरसावली. धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा कार्यालयात भगवे झेंडे फडकवित करोना योद्धय़ांना समर्थन देत भाजपचा निषेध करण्यात आला. जिल्हा कार्यालयात शारीरिक अंतरपथ्याचे पालन करीत जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र काकड, पुरूषोत्तम जाधव, प्रफुल्ल पाटील, केशव माळी, भटू गवळी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले. हिलाल माळी यांनी भाजपचे नेते सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी राजकारण करीत आंदोलन करून त्यांचा खरा चेहरा जगासमोर उघडा करीत असल्याची टीका केली.