भाजपाचे माजी खासदार विजय मुडे यांचे आज संध्याकाळी सात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते
कट्टर स्वयंसेवक असलेले मुडे यांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंजी येथील शाळेत असतानाच शिक्षक नेते म्हणून त्यांचा दबदबा निर्माण झाला होता.

पुढे त्यांचे कार्य पाहून भाजपाने त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिली.आमदार होऊन दोन महिने झाले असतांनाच त्यांना पक्षाने १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत संधी दिली. ते भरघोस मतांनी निवडून आले. मात्र मध्यावधी निवडणूक झाल्याने अवघे १३ महिनेच ते खासदार राहू शकले. यानंतर ते पक्षाच्या विविध संघटनात्मक पदांवर कार्यरत राहिले. भाजपाला ग्रामीण भागात सक्षम करण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने भाजपाचा निष्ठावंत चेहरा काळाआड गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी वर्ध्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.