दिगंबर शिंदे

सांगलीला आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून पश्चिम महाराष्ट्रातील चार जागा जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी गावच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सत्ता आयारामांच्या जीवावर का असेना, भाजपने हस्तगत केली असून ती अबाधित राहावी यासाठी पक्षाने पुन्हा एकदा चंग बांधला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीची जागा कायम राखत सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, माढा या जागासाठी पक्षाने लक्ष्य केंद्रित केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र  हा तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. २०१४  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस विचारांच्या या गडाला खिंडार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. माध्यमांचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यात भाजप यशस्वी ठरला आणि लोकसभेच्या निवडणुकीतील मोदीलाटेत सांगलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. आता सांगली हाती आहेच, पण त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या तिन्ही मतदार संघावर विजय संपादन करण्याचा भाजपाने चंग बांधला आहे.

सांगली जिल्ह्य़ातील सांगली, मिरज, कवठेमहांकाळ -तासगाव, जत, खानापूर-आटपाडी आणि पलूस-कडेगाव या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यापकी सांगली व मिरज हे दोन मतदार संघ शहरी मतदारांचे आहे, तर जिल्ह्य़ातील वाळवा आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा हातकणंगले लोकसभा मतदार संघात समावेश आहे. यामुळे दोन लोकसभा मतदार संघाचे मतदार जिल्ह्य़ात आहेत.

यापकी केवळ सांगलीची जागा संजयकाका पाटील यांच्या रूपाने सध्या भाजपकडे आहे. शिवसेनेशी युती झाली नाही तर हातकणंगले या ठिकाणी भाजपला स्वतचा उमेदवार द्यावा लागणार असून त्याचबरोबर  सातारा, कोल्हापूरच्या जागेवरही कब्जा मिळविण्यासाठी भाजपची तयारी आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळविण्याचे भाजपचे ध्येय आहे. या दृष्टीने पक्षाची मोच्रेबांधणी सध्या सुरू आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात गेल्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपने जागा दिली होती. मात्र राजू शेट्टी यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने याठिकाणी होत असलेले नुकसान भरून काढण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत, शिवसेनेशी युती झाली तर ही जागा सेनेच्या वाटय़ाला जाणार आहे. ही युती होणार हे गृहीत धरूनच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या माजी खासदार निवेदिता माने यांनी सेनेशी जवळीक साधली आहे. शेट्टी यांनी अद्याप आपले पत्ते खुले केले नसले तरी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी मिळते-जुळते घेतले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर कार्यक्रमात भाग घेऊन तसे संकेत कार्यकर्त्यांना दिले आहेत.

भाजपला सांगलीला भरभरून साथ दिली आहे. एक खासदार, चार आमदार, महापालिका, जिल्हा परिषद या संस्था दिल्या आहेत, सहकारातही जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये भाजपची मंडळी आहेत. आता पक्षाला याच पद्धतीने कोल्हापूर, सातारा जिल्हयात पक्ष अधिक सक्षम करायचा आहे. यामुळेच सत्तेत वाटा देत असताना विविध महामंडळावर अन्य पक्षातून आलेल्यांना संधी देऊन पक्ष वाढविण्याची मोहीम गेली तीन वष्रे सुरू आहे. अगदी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून अतुल भोसले, हिंदुराव शेळके, समरजितसिंह घाटगे अशी नावे घेता येतील. यामागे पक्षाचा विचार कितपत रुचला ही बाब फारशी विचारात न घेता केवळ पक्षविस्तार हीच बाब महत्त्वाची मानून कार्यक्रम सध्या सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण हे उस आणि साखर कारखानदारीवर उभारले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या पिढीतील आता तरुण रक्त राजकीय क्षितिजावर आले आहे, आणि हाच वर्ग भाजपने हेरला आहे. सहकारातील घराणेशाहीला खो घालत नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरत, सत्तेत सहभागी होण्याची संधी देत भाजपने प्रस्थ वाढविले आहे.

यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या मनात निर्माण झालेले अढीचे गणित कसे सोडविणार हाही प्रश्नच आहे, कोणाच्या मंत्रिपदाला कोणी खो घातला याचा राग या निवडणुकीत दिसणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल ती जबाबदारी या निमित्ताने पक्ष नेतृत्वावर दिसणार आहे.

काँग्रेसचीही उमेदवारीसाठी चाचपणी

एकीकडे भाजपाची लोकसभा निवडणुकीची जंगी तयारी सुरू असताना काँग्रेसची मात्र अद्याप उमेदवाराची चाचपणीच सुरू आहे. पक्षाच्या जिल्हा संसदीय मंडळाने भाजपशी लढत देण्यासाठी उमेदवारी देत असताना वसंतदादा घराण्याबाहेरील उमेदवाराचा विचार करावा, अशी उघड मागणी केली आहे. पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी प्राधान्याने माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र त्यांचा गेल्या चार वर्षांत फारसा संपर्क राहिलेला नाही. या परिस्थितीत पक्षाकडून आ. विश्वजित कदम यांना मदानात उतरविण्याचे प्रयत्न असले तरी खुद्द कदम यांची तयारी नाही.