भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अन्यथा याचा फायदा काँग्रेसला होईल. काँग्रेसची सत्ता कशी असते याचा कटू अनुभव लोकांनी घेतला आहे. ही वेळ पुन्हा जनतेवर येऊ नये यामुळे भाजपा शिवसेनेशी युती करण्यासाठी अगतिक आहे, अशी कबुली महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घडामोडी पाहता भाजपा शिवसेनेशी युती करण्यासाठी अगतिकता झाले आहे का, अशी विचारणा केली असता महसुलमंत्र्यांनी ‘होय’ अशी स्पष्टपणे कबुली दिली. याचवेळी त्यांनी ही अगतिकता कशामुळे निर्माण झाली याचे विवेचन केले.

पालघर लोकसभा निवडणुकीवरून भाजपा शिवसेनेमधील वादाला नव्याने फोडणी मिळालेली आहे. याविषयी महसूलमंत्री पाटील म्हणाले, दिवंगत चिंतामण वणगा यांच्या कुटुंबातून एकाला उमेदवारी देण्याचे भाजपाने निश्चित केले होते. पण याबाबतची कसलीच खातरजमा न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वणगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वणगा यांना उचलून आणून उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेची ही कार्यशैली पालघरमधील वादाला कारणीभूत ठरली आहे.

साखर उद्योगात निर्माण झालेल्या समस्यांबाबत केंद्र व राज्यातील प्रमुख मंत्री एकत्र येऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती महसूलमंत्री पाटील यांनी दिली. ते म्हणाले, साखरेचे अतिरिक्त उत्पादन, शेतकऱ्यांना एफआरपी मिळण्यातील अडचणी, साखर निर्यात असे काही मुद्दे ऐरणीवर आले आहेत. यातील प्रत्येक घटकाला कशा प्रकारे मदत करता येईल याचा विचार करण्यासाठी २८ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मी स्वत: उपस्थित राहणार आहे.

कर्नाटकात सत्ता संपादनासाठी भाजपाने घोडेबाजार भरवल्याच्या आरोपांचा इन्कार चंद्रकांत पाटील यांनी केला. सर्वाधिक १०४ जागा जिंकलेल्या भाजपाला सत्तेत येण्यासाठी मोजक्याच आमदारांची गरज होती. पण तिसऱ्या स्थानी असलेल्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना ८० आमदारांचे पाठबळ देऊन काँग्रेसनेच मंत्रिपदाच्या मोबदल्यात घोडेबाजार केला, असा प्रतिआरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps helplessness against shiv sena sayschandrakant patil
First published on: 26-05-2018 at 16:04 IST