उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक; एकनाथ खडसेंच्या नाराजीचे सावट

येथे आयोजित भाजपच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, चिंता तसेच आगामी काळातील पक्ष बांधणीवर चिंतन करण्यात आले. पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीचे सावट अपेक्षेनुसार बैठकीवर पडले. खुद्द खडसेंनी माध्यमांसमोर पुन्हा आपल्या नाराजीचे प्रदर्शनही केले.

बालाजी लॉन येथे आयोजित भाजपच्या बैठकीला खडसे उपस्थित राहतील किंवा नाही, त्याबद्दल साशंकता व्यक्त झाली होती. त्यामुळे सर्वाचे लक्ष खडसेंच्या उपस्थितीकडे लागून होते. प्रत्यक्षात खडसे हे दुपारपर्यंत बैठकीत न आल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबुज देखील सुरू होती. अखेर खडसेंचे दुपारनंतर आगमन झाले. त्याबद्दल खडसेंनी आपल्याला साडेतीनची वेळ देण्यात आली होती, असे स्पष्ट केले. देशभरात विविध निवडणुका सुरू होत्या. तसेच राज्यातही विधानसभा निवडणूक असल्याने भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक लांबणीवर पडली होती. ही बैठक आणखी लांबणीवर टाकणे योग्य नसल्याने त्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत निवडणुका दर तीन वर्षांनी होत असतात. अखिल भारतीय पातळीवर एक साखळी असते. ही साखळी विस्कळीत होऊ  नये म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असेही पाटील यांनी

सांगितले. धुळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने तेथील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, प्रमोद जाधव, माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे, खा. रक्षा खडसे, माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन, आ. जयकुमार रावल, आ. राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, विजय साने आदी उपस्थित होते.

‘राज्याच्या विकासाला खीळ बसण्याचा धोका’

युती सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पडताळणीचा धडाका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने लावला आहे. सरकारच्या या कृतीमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसण्याचा धोका आहे. राज्याच्या विकासाचा वेग मंदावणे नवीन सरकारला परवडणारे नाही, अशा शब्दांत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शहरातील भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णय प्रक्रियेला लक्ष्य केले.