अनेक प्रयत्न करुनही कोकणात अपेक्षित यश मिळत नसल्याने आता भाजपने मिशन कोकण सुरु केले आहे. राज्यातील विविध भागातील भाजप आमदारांना कोकणात एका मतदारसंघात जाऊन पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ‘गाव तिथे भाजपा’ संकल्पना राबवण्याचे निर्देश या माध्यमातून दिले जात आहेत. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात भाजपाला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे कोकणात संघटनात्मक बांधणीसाठी व्यापक प्रयत्न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांआधी गावागावात पक्ष संघटना मजबुत करण्याची मोहीम भाजपने आखली आहे. पक्षस्थापनेला नुकतीच ३७ वर्ष पुर्णे झाली. यानिमित्ताने केंद्र सरकार आणि राज्यसरकारने अडीच वषार्ंत केलेली कामे आणि शासनाने सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावागावात पोहोचवण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ातील आमदारांना कोकणातील एका मतदारसंघाचा दौरा करून पक्ष संघटना बांधणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रदेश कार्यकारणीने दिले आहेत.

यानुसार नागपुरचे भाजप आमदार सुधाकर कोहळे यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा दोन दिवस आढावा घेतला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बठक घेऊन गावागावात पक्ष संघटना करण्याबाबत सुचना दिल्या. विस्तारकांची नेमणुक करून शासनाच्या योजनांची माहिती गावागावात पोहोचवण्याबाबत सुचना दिल्या, याच बरोबर नागाव, अलिबाग येथे नागरिकांशी संवाद साधून शासकीय योजनांची माहिती दिली. भिम अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. शेकापच्या धोरणामुळे अलिबाग मतदारसंघाचा विकास होऊ शकलेला नाही. मात्र विकास काय असतो हे येणाऱ्या काळात पक्ष दाखवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप सरकारमुळेच मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, सागरी महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. पक्षाचे हेच काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, पंचायत समिती सदस्य उदय काठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.