विधानसभा निवडणुकीनंतर गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय विखे हे एकाकी पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी शत्रुत्व निर्माण झाले असतांना आता त्यांना भारतीय जनता पक्षातही विरोधक तयार झाले आहेत. पराभूत झालेल्या भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह तिघा आमदारांनी विखे यांच्याशी संपर्क तोडला आहे. त्यांना मंत्री पद देऊ  नये, अशा हालचाली सुरु झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिलेयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड व आमदार मोनिका राजळे या होत्या. या भेटीच्यावेळी भाजपाचे नवनिर्वाचित आमदार बबनराव पाचपुते मात्र गैरहजर होते. त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. पाचपुते यांच्या विजयासाठी विखे यांनी मदत केली होती. विखे व पाचपुते हे राजकारणात एकत्र आले आहेत.

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत पक्षात आलेल्या लोकांनीच आमचा पराभव केला, असे विश्लेषण शिंदे यांच्यासह तिघाही आमदारांनी केले. आज दिवसभर तिघा आमदारांनी, मंत्री विखे यांनी पक्षात कोणीही वरचढ होऊ  नये म्हणून राजकीय कुरघोडय़ा केल्या, असा आरोप केला. विखे यांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा लेखाजोखा या वेळी मांडला. विखे यांना मंत्रीपद देऊ  नये, त्यामुळे पक्षाची हानी होईल, असे सांगण्यात आले. दिवसभर ही चर्चा होती. तसेच समाज माध्यमांवरही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीचे छायाचित्र व संदेश फिरत होते.

नगर जिल्हयात विखे यांनी पाडापाडीचे राजकारण केले. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ  नये, अशी मागणीही करण्यात आली. या भेटीपासून विखे यांना दूर ठेवण्यात आले होते. शिवसेनेचे पराभूत उमेदवार विधानसभेचे उपसभापती विजय औटी व अनिल राठोड, यांनीदेखील विखे यांच्याबद्दल शिवसेना नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. शिवसेनेने एकनिष्ठ काम करुनही विखे यांची मदत झाली नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. शिवसेनेचे उमेदवार व माजी आमदार कांबळे यांनी मात्र विखे यांची मदत मिळाल्याचे सेना नेत्यांना सांगितले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत जिल्ह्यच्या राजकारणावर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार व कार्यकर्त्यांची आज पवार यांनी बारामतीत भेट घेतली. या वेळीदेखील विखे यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा टीका झाली. दोन्ही काँग्रेस हे सध्या विखे यांचे शत्रू आहेत. मात्र आता शिवसेना व भारतीय जनता पक्षातूनही विखे यांना विरोध सुरु झाला असून ते एकाकी पडले आहेत.

विरोधाची चर्चा झालीच नाही

निवडणुकीत विजयी झाले म्हणजेच मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, असे होत नाही. आमचा जरी पराभव झाला असला तरी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. निवडणुकीतील पराभवाची चर्चा झाली नाही. कोणतेही निवेदन दिले नाही. कोणी काम केले, कोण विरोधात गेले, कोण बरोबर होते, याची काही आता चर्चा नाही. राजकारणात ज्या त्या वेळी निर्णय होत असतात, असे माजी आमदार शिवाजी कर्डिलेयांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.

* मंत्री विखे यांच्याबद्दल कोणतीही चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या भेटीत झाली नाही, असेही कर्डिलेम्हणाले. बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही.

विखेंच्या विरोधात भेट नव्हती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट पराभूत नेते तसेच आमदार मोनिका राजळे यांच्यासमवेत झाली. या भेटीत राधाकृष्ण विखे अथवा डॉ.सुजय विखे यांच्या विरोधात कोणतीही चर्चा झाली नाही. कोणतेही निवेदन दिले गेले नाही. मात्र या भेटीचा अर्थ काही लोकांनी चुकीचा लावलेला आहे. अर्थ लावून माध्यमांमध्ये बातम्या येत असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी सांगितले.